विश्वभरातील क्रीडापटूंसह चाहत्यांसाठीसुद्धा निराशाजनक ठरलेले २०२० हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना सामने खेळण्यासह जैव-सुरक्षित वातावरणाची सवय झालेल्या खेळाडूंना जवळपास अर्धे वर्ष मैदानापासून दूर राहून स्वत:ची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती जपावी लागली. परंतु क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ या खेळांनी करोनाकडून चाहत्यांचे लक्ष वळवण्यात मोलाची भूमिका बजावली. वर्षभरात झालेल्या मोजक्या क्रीडा स्पर्धामधील भारतीय तसेच विदेशी खेळाडूंच्या कामगिरीचा आणि क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रमुख घटनांचा घेतलेला हा धावता आढावा-

लेवांडोवस्की आणि बायर्न म्युनिकचे वर्चस्व

फुटबॉल

स्पर्धात्मक सामन्यांपासून दूर असलेल्या भारतीय फुटबॉलपटूंना यंदा किमान इंडियन सुपर लीगमुळे स्वत:चे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये पोलंडच्या रॉबर्ट लेवांडोवस्कीने वर्चस्व गाजवले. बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीग आणि बुंडेसलिगाचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या लेवांडोवस्कीने फिफाकडून दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावरही नाव कोरले. एकीकडे लिओनेल मेसीने महान फुटबॉलपटू पेले यांच्या एकाच क्लबसाठी सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाला मोडीत काढून बार्सिलोना आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. परंतु दुसरीकडे अर्जेंटिनाच्याच विश्वचषक विजयाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे निधन झाल्यामुळे क्रीडा जगतात शोककळादेखील निर्माण झाली.

धोनी-रैनाची निवृत्ती, कसोटीत भारताची नाचक्की

क्रिकेट

भारतीय क्रिकेट चाहत्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन कायमस्वरूपी स्मरणात राहील. विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि उपयुक्त अष्टपैलू सुरेश रैना यांनी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यामुळे भारतीय संघात पोकळी निर्माण झाली. त्याशिवाय एकदिवसीय आणि ट्वेन्टी—२० प्रकारांत संमिश्र कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला कसोटीमध्ये मोठय़ा नाचक्कीला सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीय क्रिकेट इतिहासातील नीचांकी धावसंख्या नोंदवली. तब्बल १२ वर्षांनंतर प्रथमच कोहलीला संपूर्ण वर्षांत एकही शतक झळकावता आले नाही. मार्च महिन्यापासून खेळापासून दुरावलेल्या सर्व खेळाडूंना ‘आयपीएल‘च्या रूपाने करोना काळातही क्रिकेटची लस मिळाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा ‘आयपीएल‘चे जेतेपद पटकावले. त्यापूर्वी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेद्वारे प्रथमच प्रेक्षकांविना जैव-सुरक्षिततेच्या नियमांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले.

वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या युवा विश्वचषकात भारताला जेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. यशस्वी जैस्वालच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही भारताला अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्याचप्रमाणे भारतीय महिला संघाने मार्चमध्ये झालेल्या ट्वेन्टी—२० विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले.

मानसीची टाइमवर नाममुद्रा

बॅडमिंटन

यंदाच्या वर्षांंतील बहुतांश बॅडमिंटन स्पर्धा रद्द झाल्या. परंतु त्यातही मानसी जोशी या पॅराबॅडमिंटनपटूसाठी हे वर्ष फलदायी ठरले. २०१९मध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहोर उमटवणाऱ्या मानसीच्या कामगिरीची दखल घेत सुप्रसिद्ध ‘टाइम’ साप्ताहिकाने तिचा ‘नव्या पिढीची नायिका’ म्हणून गौरव करतानाच तिला  साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर स्थान दिले. दरम्यान टाळेबंदीपूर्वी झालेल्या तीन बॅडमिंटन स्पर्धामध्ये भारताला एकाही गटाचे विजेतेपद मिळवता आले नाही.

नागल, गुणेश्वरन यांची भरारी

टेनिस

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठून भारताच्या सुमित नागलने इतिहास रचला. भारताकडून ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला, तर प्रज्ञेश गुणेश्वरनने वर्षभरात दोन एटीपी चॅलेंजर स्पर्धाचे उपविजेतेपद मिळवले. ग्रँडस्लॅम स्पर्धाना यंदा डॉमिनिक थिमच्या रूपात मोठय़ा कालांतराने नवा विजेता मिळाला, तर ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच स्पर्धेतील वर्चस्व कायम राखण्यात अनुक्रमे नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल यशस्वी ठरले.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

बुद्धिबळ

बुद्धिबळविश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या फिडे ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने रशियाच्या बरोबरीने ऐतिहासिक सहविजेतेपद मिळवले. विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी या अनुभवी खेळाडूंना विदीथ गुजराती, दिव्या देशमुख, आर. प्रज्ञानंद आणि निहाल सरीन या युवा फळीची सुयोग्य साथ लाभली. टाळेबंदीदरम्यान बुद्धिबळानेच ऑनलाइन स्पर्धाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला सर्वाधिक चालना दिली.

अमितचा सुवर्णपंच

बॉक्सिंग

भारताच्या अमित पंघालने जर्मनीत झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णासह एकूण नऊ पदकांची कमाई केली. भारतासाठी महिलांमध्ये सिमरनजीत कौर आणि मनीषा मौन यांनी सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली.

जेहानचे यश, हॅमिल्टनची सत्ता

मोटारस्पोर्ट्स

मुंबईतील २२ वर्षीय जेहान दारुवालाने डिसेंबरच्या सुरुवातीला फॉम्र्युला—२ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. भारताकडून प्रथमच एखाद्या चालकाने फॉम्र्युला—२ ही शर्यत जिंकल्याने जेहानचे देशभरात कौतुक करण्यात आले. फॉम्र्युला-१मध्ये मात्र लुइस हॅमिल्टनने त्याची सत्ता कायम राखली आहे.

मृत्यू

’ बलबिर सिंग वरिष्ठ ’ वसंत रायजी

’ दिएगो मॅराडोना ’ डीन जोन्स

’ चुनी गोस्वामी ’ पी. के. बॅनर्जी

’ श्रीपती खंचनाळे ’ एव्हर्टन विक्स

’ कोबे ब्रायंट

(संकलन : ऋषिकेश बामणे)