कोटलाच्या खेळपट्टीकडून आम्हाला ज्याप्रकारे मदतीची अपेक्षा होती, तशी न मिळता उलट आमचेच डावपेच फसल्याची प्रतिक्रिया दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने शनिवारी व्यक्त केली.

शुक्रवारी संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी कोटलाच्या खेळपट्टीवर टीका केली होती, त्यात आता पृथ्वीचीही भर पडल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता बळावली आहे. पाँटिंगने खेळपट्टीतज्ज्ञांनी आम्हाला सर्वोत्तम खेळपट्टी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याची म्हटले होते.

‘‘कोटलाची खेळपट्टी अपेक्षेच्या विपरीत खेळत होती. तेथे पहिल्या षटकापासूनच चेंडू फिरत होता. त्याशिवाय चेंडू संथ गतीने बॅटवर येत असल्यामुळे फलंदाजांना फटके खेळणे कठीण गेले,’’ असे पृथ्वी म्हणाला.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना काही बदल जाणवला का याविषयी विचारले असता पृथ्वी म्हणाला, ‘‘दुसऱ्या डावातही खेळपट्टीत काही बदल झाला असे मला वाटत नाही. फक्त दवामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा लाभ झाला. परंतु आता जे झाले ते विसरून येणाऱ्या सामन्यांसाठी आम्हाला सज्ज व्हावे लागेल.’’ याव्यतिरिक्त विश्वचषकाच्या संघात स्थान मिळेल की नाही याविषयी मी विचार करत नसून सध्या माझे लक्ष फक्त आयपीएलमध्ये धावांचे इमले रचण्यावर आहे, असे पृथ्वीने सांगितले.