सार्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडररने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. वाढते वय आणि दुखापती यांना टक्कर देत फेडररने ३५व्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ कोर्टपासून दूर राहिल्यामुळे फेडररच्या निवृतीच्या चर्चाना उधाण आले होते. यंदाच्या वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत फेडरर खेळणार का याविषयी साशंकता होती. मात्र अफलातून ऊर्जा, घोटीव खेळ आणि तंदुरुस्ती यांच्या बळावर फेडररने तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवला. कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवत फेडररने जेतेपद नावावर केले आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. दुखापतींचा विचार करून वर्षांत ठरावीक स्पर्धाच खेळणार असल्याचे संकेत फेडररने दिले होते. त्यानुसार फेडररने क्ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच खुल्या स्पर्धेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून लाडक्या ग्रास कोर्टवर होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेच्या तयारीसाठी त्याला पुरेसा वेळ मिळू शकेल. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सात जेतेपदे फेडररच्या नावावर आहेत. २८ मे ते ११ जून या कालावधीत फ्रेंच खुली स्पर्धा होणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी फेडरर या स्पर्धेत खेळणार नाही.
‘तंदुरुस्त राहण्यासाठी मी कसून मेहनत घेतो आहे. आणखी काही वर्षे खेळत राहण्यासाठी मला स्पर्धामध्ये नियोजनपूर्वक सहभागी व्हावे लागेल. सहा वर्षे दुखापतीमुळे दूर राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेद्वारे पुनरागमन केले. जेतेपद पटकावू शकलो याचे समाधान आहे. क्ले कोर्ट हंगामातून विश्रांती घेत ग्रास आणि हार्डकोर्टसाठी सज्ज होणे योग्य ठरेल. फ्रेंच खुल्या स्पर्धेत चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा असतो. त्यांचे प्रेम यंदा अनुभवता येणार नाही. मात्र माझी भूमिका ते समजून घेतील याची खात्री आहे’, असे फेडररने सांगितले. ‘वर्षांची सुरुवात माझ्यासाठी चांगली झाली आहे. मात्र उत्साहाच्या भरात निर्णय घेणे योग्य होणार नाही. दुखापतींमुळे माझ्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. ते लक्षात घेऊन कोणत्या स्पर्धामध्ये खेळायचे याचा निर्णय घेतो आहे’, असे फेडररने पुढे सांगितले.
नदाल लाल मातीचा बादशाह समजला जातो. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या नदालने बार्सिलोना, माँटे कार्लोपाठोपाठ माद्रिद स्पर्धेचे जेतेपद पटकावत फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी तय्यार असल्याचे सिद्ध केले आहे. कारकीर्दीत असंख्य वेळा नदालच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या वाटचालीत फेडररच मोठा अडथळा राहिला आहे. फेडररने माघार घेतल्यामुळे नदालसाठी आव्हान सोपे झाले आहे.