ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत का आहे, हे पुन्हा एकदा त्याने आपल्या अप्रतिम खेळीच्या जोरावर दाखवून दिले. गेल्या पाच सामन्यांमधील तिसरी हॅट्ट्रिक साजरी करताना त्याने रीअल माद्रिदला ला लीगा लीगमध्ये अ‍ॅथलेटिक बिलबाओवर ५-० असा दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयाने माद्रिदने पहिल्यांदाच अव्वल चार संघांमध्ये मजल मारली आहे.
सामन्याला सुरुवात झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला रोनाल्डोने पहिला गोल करत आपले इरादे स्पष्ट केले. अ‍ॅथलेटिक बिलबाओसारख्या अननुभवी संघाचा माद्रिद धुव्वा उडवणार हे रोनाल्डोच्या गोलने साऱ्यांनाच समजले. संघातील अजून एक हुकमी एक्का असलेल्या करिम बेन्झेमाने रोनाल्डोला सुयोग्य साथ दिली. त्याने ४४व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल करत मध्यांतरापर्यंत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रामध्ये रोनाल्डो चांगलाच तळपला. त्याने मध्यंतरानंतर दहाव्या मिनिटाला (५५ मि.) संघासाठी तिसरा गोल केला. त्यानंतर सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना रोनाल्डोने ८८व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापूर्वी सामन्याच्या ६९व्या मिनिटाला बेन्झेमाने संघासाठी चौथा गोल केला होता. या विजयाने माद्रिदने अ‍ॅटलेटिको माद्रिदसारख्या मातब्बर संघाला पाचव्या स्थानावर धाडत चौथे स्थान पटकावले आहे. माद्रिदपुढे आता बार्सिलोना, व्हॅलेनशिया आणि सेव्हिला हे तीन संघ आहेत.

ला लीगा स्पर्धेतील हॅट्ट्रिक
ख्रिस्तियानो रोनाल्डो    २२
अल्फ्रेडो डी सेफानो      २२
टेल्मो झारा                  २२
एडमुंडो सुआरेझ         १९
लिओनेल मेस्सी          १९