एस. अपूर्वा, राष्ट्रीय अजिंक्यपद विजेती कॅरमपटू

ऋषिकेश बामणे

गेल्या काही वर्षांत भारताला अनेक उदयोन्मुख महिला कॅरमपटू गवसल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सामने आता अधिक रंगतदार होत आहेत. त्यामुळे कॅरममध्ये कारकीर्द घडविण्यासाठी महिलांना अधिक पाठिंबा दिल्यास ते भारतासाठीच फलदायी ठरेल, अशी प्रतिक्रिया हैदराबादची नामांकित कॅरमपटू एस. अपूर्वाने व्यक्त केली.

३८ वर्षीय अपूर्वाने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील महिला एकेरी गटाच्या विजेतेपदावर प्रथमच नाव कोरले. एकीकडे क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन या खेळांना फ्रँचाइजी लीगमुळे मोठय़ा प्रमाणावर प्रकाशझोत लाभत असताना कॅरमचीही लवकरच लीग सुरू व्हावी आणि त्यामध्ये महिलांचासुद्धा समावेश असावा, अशी अपेक्षा व्यावसायिक पातळीवर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) प्रतिनिधित्व करणाऱ्या अपूर्वाने बाळगली आहे. या पार्श्वभूमीवर महिला कॅरमपटूंच्या प्रगतीविषयी अपूर्वाशी केलेली ही खास बातचीत.

* कारकीर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतरचा अनुभव कसा होता?

२८ वर्षांच्या कारकीर्दीत मी विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना विजेतेपद मिळवले आहे. परंतु राष्ट्रीय विजेतेपदाने मला नेहमीच हुलकावणी दिली होती. त्यामुळे हे अजिंक्यपद माझ्यासाठी खास आहे. येथे पहिल्या फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक लढतीत तुमचा कस लागतो. विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडूंविरुद्ध कडवी झुंज देऊन विजेतेपद साकारल्याचा आनंद आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी मी ज्या मेहनतीने सराव करते, त्याचप्रमाणे या वेळीही सराव केला. परंतु कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे या वेळी विजेतेपद मिळवेनच, याची खात्री होती.

* कॅरममधील महिलांच्या प्रगतीविषयी तुझे काय मत आहे?

निश्चितच गेल्या काही वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यातून गुणवान महिला कॅरमपटू उदयास आल्या आहेत. परंतु चाहत्यांनी त्यांच्या कामगिरीची दखल घेणे आवश्यक आहे. महिला कॅरमपटूंचा दर्जा आता पूर्वीपेक्षा फार उंचावला आहे. विशेषत: कॅरम हा असा खेळ आहे, त्यामध्ये तुम्हाला अधिक खर्च करण्याची किंवा विशेष वेळ काढण्याची गरज लागत नाही. फक्त एकदा तुम्हाला या खेळाची आवड निर्माण झाल्यास योग्य मार्गदर्शन देणाऱ्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय सध्या प्रत्येक खेळाच्या फ्रँचाइजी लीग सुरू झाल्या आहेत. परंतु यामध्ये महिलांचा समावेश कमी प्रमाणात आढळतो. भविष्यात कॅरमचीसुद्धा प्रीमियर लीग सुरू झाल्यास त्यामध्ये महिलांनाही पुरुषांप्रमाणेच समान सामने खेळण्याची संधी द्यावी, अशी माझी अखिल भारतीय कॅरम महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे.

* आगामी आव्हानांसाठी कशा रीतीने तयारी करत आहेस?

सध्या माझे मुख्य लक्ष्य हे वाराणसी येथे होणारी फेडरेशन चषक स्पर्धा असून वर्षअखेरीस रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचेसुद्धा माझे उद्दिष्ट आहे. त्याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न असेल.

* तुझ्या आजवरच्या प्रवासात कोणाचे सर्वाधिक योगदान लाभले?

वयाच्या १०व्या वर्षी वडील साईकुमार यांच्याकडून प्रेरणा घेत मी कॅरम खेळायला सुरुवात केली. पती किशोरकुमार हे स्वत: राष्ट्रीय बॅडमिंटनपटू असल्याने त्यांनीही कधी मला कॅरम खेळण्यापासून रोखले नाही. त्याचप्रमाणे तेलंगणा कॅरम संघटना आणि अखिल भारतीय कॅरम महासंघाने मला नेहमीच पाठिंबा दिला. या सर्वाच्या सहकार्यामुळे मी २००४ आणि २०१६च्या जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवू शकले. त्याचप्रमाणे २०१८मध्ये झालेल्या विश्वचषकातही मला भारताकडून खेळण्याची संधी लाभली. भविष्यात उदयोन्मुख कॅरमपटूंना घडवण्याचीही माझी इच्छा आहे.