सचिन तेंडुलकर हा प्रचंड क्षमता असलेला फलंदाज होता. तो द्विशतक काय तर त्रिशतक किंवा चारशे धावा देखील ठोकू शकला असता. पण दुर्देवाने तो मुंबईतल्या शाळकरी वातावरणातून बाहेरच आला नाही. तो फक्त सेंच्युरीसाठीच खेळायचा त्यापुढचा विचार करायचाच नाही, असे परखड मत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. दुबईतील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले आहे.
माझे विधान चुकीच्या घेऊ नका असे सुरूवातीलाच स्पष्ट करत कपिल देव म्हणाले की, सचिनने स्वत:च्या क्षमतेवर आणि गुणवत्तेवर अन्याय केला. त्याने जे विक्रम करून ठेवलेत त्यापेक्षा नक्कीच तो कितीतरी जास्त तो करू शकला असता. आंतरराष्ट्रीय खेळात लागणारी क्रूरता त्याला आत्मसात करता आली नाही. तो फक्त शालेय क्रिकेटच्या मानसिकतेत अडकून पडला. मुंबईतील खेळाडूंपेक्षा त्याने विवियन रिचर्ड्ससारख्या फलंदाजांसोबत अधिक वेळ घालवायला हवा होता, असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले. तसेच सचिनसोबत राहण्याची मला अधिक काळ राहण्याची संधी मिळाली असती तर मी त्याला सेहवागसारखं निर्धास्त खेळायचा सल्ला दिला असता, असेही ते पुढे म्हणाले. सचिनमध्ये आक्रमकपणा होता पण तो कालानुरूप मारला गेला. सेंच्युरीच्या पुढे द्विशतक, त्रिशतक किंवा ४०० धावांसाठी खेळणे त्याला माहितच नव्हते. रिचर्ड्ससारखा निर्धास्त खेळ त्याला करता आला नाही तो केवळ परिपूर्ण आणि सुबक खेळाडू होता, असे कपिल देव यांनी मुलाखतीत नमूद केले.