मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आवडता शॉट हा ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ आहे हे कोणापासूनही लपलेलं नाही. त्याने वेळोवेळी अनेक मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे. आणखी एक गोष्टीवरील त्याचं प्रेम कधीही लपून राहिलेलं नाही ती गोष्ट म्हणजे ‘वडा पाव’. मुंबईतील सर्वात लोकप्रिय फास्ट फूड्सपैकी एक म्हणजे वडापाव. पण गेले काही महिने करोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे रस्त्यावर वडा पाव मिळणं जरा कठीण झालंय. अशा परिस्थितीत सर्वसाधारण वडा पाव प्रेमी जे करेल तेच सचिनने केलं. सचिनने रविवारी झकासपैकी घरीच गरमागरम वडा पावचा बेत केला आणि त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

सचिनने आपल्या पोस्टमध्ये दोन फोटो पोस्ट केले. वडा पाव हे माझं सर्वात आवडतं स्नॅक्स होतं, आहे आणि कायम राहिल असं कॅप्शन सचिनने त्या फोटोला दिलं. तर दुसऱ्या फोटोत त्याला एक गोंडस मांजरीच्या रूपाने ‘अनपेक्षित पाहुणा’ दिसला. सचिनने त्या मांजरीचा फोटोही पोस्ट करत लिहिलं की एक अनपेक्षित पाहुणादेखील वडापाव खायला आला होता.

पाहा फोटो-

काही दिवसांपूर्वी सचिनने आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवसदेखील छान साजरा केला होता. लॉकडाउन काळात नेहमीसारखं सेलिब्रेशन करता आलेलं नसलं, तरीही आपली पत्नी अंजली व घरातील इतरांना खुश करण्यासाठी सचिनने खास बेत आखला होता. आंब्याचा हंगाम सुरु असल्याने सचिनने एका खास पद्धतीने आंबा कुल्फी तयार केली. आपल्या या खास रेसिपीचा व्हिडीओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला होता.