पुणे : लहानपणी मी खूप मस्तीखोर होतो. माझी मस्ती जिरवण्यासाठी मोठे बंधू अजित यांनी मला वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळावयास घातले. त्यांनी जर मला खेळावयास घातले नसते तर तुम्हाला आजचा सचिन पाहावयास मिळाला नसता. त्यामुळेच लहानपणापासून क्रिकेट हाच माझा श्वास झाला आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत क्रिकेटच माझ्या हृदयस्थानी राहणार आहे, असे सचिन तेंडुलकरने सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘युवा व तंदुरुस्त भारत’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सचिनच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, विद्यापीठ क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने उपस्थित होते. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांनी सचिनची मुलाखत घेतली.

आपल्या यशस्वी कारकीर्दीचे श्रेय सर्व कुटुंबीय तसेच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना देताना सचिन म्हणाला, ‘‘लहानपणापासून शरीरातील ऊर्जा खेळासाठी वापरली तर आपोआप चांगले यश मिळते हे बाळकडू मला लहानपणीच लाभले. सुरुवातीच्या काळात मी टेनिस चेंडूवरच सराव केला. त्या वेळी फारशा सुविधा व सवलती नव्हत्या तरीही आम्ही कोणतीही तक्रार न करता खेळलो. २००६-०७ मध्ये आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी मुंबईत पावसामुळे आमच्यापुढे सराव कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला होता. मी पॅड्स, ग्लोव्हज आदी आयुधे घेऊन चक्क चिखलमय मैदानावर उतरलो, तेव्हा संघातील अन्य सहकाऱ्यांना आश्चर्य वाटले. माझा उत्साह पाहून तेही सहभागी झाले.’’

‘‘क्रीडा विकासाकरिता पालक व शिक्षक यांच्यामध्ये वैचारिक भागीदारी झाली पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रमात खेळ हा अनिवार्य विषय करण्याची आवश्यकता आहे. खेळात करिअर करणाऱ्यांना अतिरिक्त गुण व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपल्याकडे प्रशिक्षकांची कमतरता नाही. अनेक ज्येष्ठ खेळाडूंना योग्य नोकरी मिळत नाही. शाळा व महाविद्यालयांनी निवृत्त खेळाडूंचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला पाहिजे. त्यामुळे ज्येष्ठ खेळाडूंच्या ज्ञानाचा योग्य रीतीने उपयोग होईल,’’ असे सचिनने सांगितले.

सचिन उवाच!

*  प्राथमिक शाळेपासूनच खेळ अनिवार्य करावा.

*  मैदानांचा उपयोग खेळासाठीच व्हावा. ज्या संस्था स्वत:च्या मैदानांचा खेळासाठी उपयोग करत नाहीत, त्यांनी अन्य संस्थांना खेळासाठी मैदाने द्यावीत. मैदानांना ऐतिहासिक वारसा म्हणून जपले पाहिजे.

*  छोटय़ा मैदानांवरही कबड्डी, फाइव्ह अ साइड फुटबॉल, लंगडी आदी अनेक खेळ खेळता येतात.