जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याचा मान पटकावणारा सईद अजमल परिस्थितीच्या गर्तेत अडकला आहे. गोलंदाजीची शैली अवैध ठरवण्यात आल्याने अजमलच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असणाऱ्या अजमलला या बंदीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. हे पुरेसे नाही म्हणून युवा खेळाडूंना फिरकीचे प्रशिक्षण देण्यासाठी अजमलने सुरू केलेली अकादमी दहशतवाद्यांच्या भीतीमुळे बंद करावी लागली आहे.
पाकिस्तानमधील फैसलाबाद स्थित अकादमी शहरातील कृषी विद्यापीठाच्या जागेवर वसली आहे. दहशतवाद्यांनी ही अकादमी हल्ल्याचे लक्ष्य ठरू शकते, असा इशारा दिल्याने अजमलने फैसलाबादच्या उपायुक्तांशी चर्चा केली आणि यानंतर तात्पुरत्या काळासाठी अकादमी बंद
करण्याचा निर्णय अजमलने
घेतला आहे.
पंजाब सरकारने अकादमीचे हित लक्षात घेऊन ती बंद करण्याची सूचना केली होती. पुरेशी सुरक्षा व्यवस्था अमलात येईपर्यंत अकादमी बंद ठेवावी, अशा स्वरुपाचा सल्ला प्रशासनाने दिल्याने अजमलसमोर अकादमी बंद करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
गोलंदाजीच्या चाचणीसाठी अजमल इंग्लंडला जाणार
आंतरराष्ट्रीय कारकीर्द सावरण्यासाठी उत्सुक असलेला पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने गोलंदाजीच्या शैलीच्या औपचारिक चाचणीसाठी भारतापेक्षा इंग्लंडला प्राधान्य देईन, असे म्हटले आहे. ‘‘महिन्याच्या उत्तरार्धात मी चाचणीसाठी जाणार आहे, परंतु चेन्नईतील गोलंदाजीच्या केंद्रात नव्हे, तर इंग्लंडला जाईन,’’
असे अजमल यावेळी म्हणाला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून अजमलवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.