भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिच्या कारकिर्दीला पैलू पाडणारे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यात मतभेद झाले आहेत. त्यामुळे फॉर्मशी झगडणाऱ्या सायनाने दक्षिण कोरियामधील इन्चॉन येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या तयारीसाठी माजी मुख्य प्रशिक्षक विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जूनमध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे जेतेपद जिंकून सायनाने २० महिन्यांचा विजेतेपदांचा दुष्काळ संपवला होता. याचप्रमाणे मे महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या उबेर चषक स्पध्रेतही तिने चांगली कामगिरी केली होती. परंतु तंदुरुस्तीच्या कारणास्तव ग्लास्गोला झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सायनाला आपल्या सुवर्णचषकावर वर्चस्व राखण्यासाठी सहभागी होता आले नव्हते.
सर्वोत्तम प्रयत्न आणि प्रशिक्षण दिमतीला असतानाही गेल्या आठवडय़ात सायनाला पदक जिंकण्यात अपयश आले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विश्वक्रमवारीतील अव्वल स्थानावरील चीनच्या लि झुरूईने तिचा पराभव केला होता. आता आशियाई क्रीडा स्पर्धा पंधरवडय़ावर आली असताना सायनाने विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचे निश्चित केले आहे. उबेर चषकात त्यांचे कानमंत्र तिला उपयुक्त ठरले होते.
२३ वर्षीय सायना मंगळवारी बंगळुरूच्या प्रकाश पदुकोण अकादमीत दोन आठवडय़ांच्या सरावासाठी दाखल झाली आहे. याबाबत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना म्हणाली, ‘‘उबेर चषकात विमल कुमार यांचे सल्ले मला मार्गदर्शक ठरले होते. आशियाई क्रीडा स्पर्धा ही मोठी स्पर्धा असल्यामुळे मला त्या दृष्टीने विमल यांचे मार्गदर्शन घ्यायचे होते. मला पदक जिंकायचे आहे आणि माझा निर्णय मला सहाय्य करील अशी आशा आहे.’’
विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याच्या निर्णयामुळे सायना आणि तिला प्रदीर्घ काळ पाठबळ देणारे प्रशिक्षक गोपीचंद यांच्यात फारकत निर्माण झाली आहे. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायनाने वीसहून अधिक आंतरराष्ट्रीय विजेतीपदे जिंकले आहेत. यात २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेतील सुवर्णपदक आणि लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदकाचा समावेश आहे. परंतु हा तात्पुरत्या स्वरूपाचा निर्णय असून, गोपीचंद यांच्यापासून दुरावली नसल्याचे सायनाने स्पष्ट केले आहे.
‘‘हे फक्त १५ दिवसांचे सरावसत्र आहे. आशियाई स्पर्धा संपल्यावर मी हैदराबादलाच परतणार आहे. गोपीसरच माझे प्रशिक्षक असतील आणि हा फक्त तात्पुरता निर्णय आहे,’’ असे तिने पुढे सांगितले.
तीन वर्षांपूर्वी सायनाने प्रशिक्षक पी. भास्कर बाबू यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु फक्त तीन महिन्यांतच २०१२च्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सायना गोपीचंद यांच्याकडे परतली होती. हैदराबादच्या या सुवर्णकन्येने ऑक्टोबर २०१२मध्ये डेन्मार्कला झालेल्या सुपर सीरिज स्पध्रेचे विजेतेपद जिंकले होते. परंतु त्यानंतर तंदुरुस्ती आणि कामगिरी या बाबतीत ती झगडतानाच पाहायला मिळाली. अखेर या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा तिला जिंकता आली.