भारताच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी सलामीच्या लढतीत जपानच्या मिनात्सू मितानी हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ही स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. सायनाच्या गटात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लि झुरूई, जागतिक क्रमवारीतील सातवी मानांकित येऑन जु बेई यांचा समावेश आहे. झुरूईशी १२ डिसेंबरला सायनाचा सामना होईल तर जु बेईशी १३ डिसेंबरला लढत होईल.
सुपर सीरिजच्या १२ स्पर्धामधील कामगिरीच्या आधारे सर्वोत्तम आठ खेळाडूंची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात येते. दोन गटांत या खेळाडूंची विभागणी करण्यात आली असून, दोन्ही गटांतील पहिले दोन खेळाडू बाद फेरीसाठी पात्र ठरतील स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला ४० हजार डॉलर्सचे पारितोषिक दिले जाणार आहे. ‘‘या स्पर्धेत मला फारशी अनुकूल कार्यक्रमपत्रिका नसली तरी मी येथे सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीच प्रयत्न करणार आहे,’’ असे सायनाने सांगितले. सायनाने २०११मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
पुण्याच्या उदय साने यांची पंचपदी नियुक्ती
या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस उदय साने यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही त्यांनी सुपर सीरिज स्पर्धेत पंच म्हणून काम केले होते. त्यांनी जागतिक स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी पंच व तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे.