भारताचे हॉकी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांची स्पष्टोक्ती
संदीप सिंग आणि अन्य खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. आगामी ऑलिम्पिक स्पध्रेसाठी हॉकी संघाची बांधणी आता सुरू झाली आहे, असे संकेत प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी दिले आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत युवा भारतीय संघाने चौथे स्थान मिळवले.
हुकूमी ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग याचप्रमाणे तुषार खंडकर, शिवेंद्र सिंग आणि माजी कप्तान भरत छेत्री हे अनुभवी खेळाडू चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेसाठी भारतीय संघात नव्हते. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली स्पध्रेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. ‘‘अनुभवी वरिष्ठ खेळाडूंना भारतीय संघात स्थान पुन्हा मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. युवा खेळाडू आपली कामगिरी जितक्या प्रमाणात उंचावत जातील, तितक्याच प्रमाणात या खेळाडूंना संघात परतणे कठीण जाईल,’’ असे नॉब्स यांनी सांगितले.
‘‘संघातील प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेनुसार निवडण्यात आले आहे. वरिष्ठ खेळाडूंना दूर ठेवण्यात आले आहे, असा याचा अर्थ नाही. फक्त त्यांना अधिक कष्ट करावे लागणार आहेत,’’ असे ते पुढे म्हणाले.