होबार्ट : भारताची दुहेरीतील आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने शुक्रवारी युक्रेनच्या नाडिआ किचेनॉकच्या साथीने होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

एक तास आणि २४ मिनिटे रंगलेल्या उपांत्य सामन्यात सानिया आणि किचेनॉक यांनी तमारा झिदानसेक आणि मारिआ बोझकोव्हा यांना ७-६, ६-२ असे पराभूत केले. पाचव्या मानांकित सानिया-किचेनॉक यांच्यासमोर अंतिम लढतीत दुसरी मानांकित जोडी शुआई पेंग आणि शुआई झांग यांचे आव्हान असणार आहे.

दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करणाऱ्या सानियाने ऑक्टोबर, २०१७मध्ये अखेरची स्पर्धा खेळली होती. शुक्रवारी झालेल्या उपांत्य सामन्यात सानिया आणि नाडिआ यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.

पहिल्या सेटमध्ये त्यांनी एकवेळ ४-२ अशी आघाडी घेतली होती. परंतु मग तमारा-मारिआ यांच्या जोडीने मुसंडी मारल्यामुळे सामना टायब्रेकपर्यंत पोहचला. तिथे सानिया-नाडिआ यांनी अनुभवाच्या बळावर माजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-नाडिआ यांनी प्रतिस्पर्धी जोडीला डोके वर काढण्याची फारशी संधीच उपलब्ध होऊ दिली नाही. त्यांनी ६-२ अशा फरकाने सेटसह सामनासुद्धा खिशात घातला.