पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी मात करत भारताने टी-२० मालिकेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या भारतीय संघाला हा विजय आवश्यक होता. टी. नटराजन आणि युजवेंद्र चहल यांच्या माऱ्यासमोर कांगारुंनी नांगी टाकली. भारतीय संघाने या सामन्यात बाजी मारली असली तरीही या विजयाला वादाची किनार लाभली आहे. फलंदाजी करताना जाडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागल्यामुळे Concussion Substitute च्या नियमाअंतर्गत सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी युजवेंद्र चहलला गोलंदाजी करण्याची संधी दिली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असल्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानावर उतरला नाही. चहलच्या खेळण्यावरुन आणि जाडेजाच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामध्ये भारताचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांचीही भर पडली आहे. कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार चहलला संघात घेण्यात आलं, मात्र हे नियमाचं उल्लंघन होतं, असं मत संजय मांजरेकर यांनी मांडलं आहे. सामन्यादरम्यान समालोचन करताना मांजरेकरांनी जाडेजाच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जाडेजाच्या डोक्याला चेंडू लागला तेव्हा भारतीय संघाचे फिजिओ मैदानात का पोहचले नाहीत? असा प्रश्न मांजरेकरांनी यावेळी उपस्थित केला.

खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागला असतानाही फिजिओ मैदानात का आले नाहीत. याप्रकरणात प्रोटोकॉल तोडण्यात आला आहे. मॅच रेफ्री या मुद्द्यावरुन भारताला नक्कीच प्रश्न विचारतील. एखाच्या फलंदाच्या डोक्याला चेंडू लागला असेल तर टीमचा फिजियो तात्काळ मैदानात जाऊन फलंदाजीची दुखापत बघतो आणि प्राथमिक उपचार करतो. खेळाडूला कसं वाटत आहे, हेदेखील फिजियो विचारतो. तसेच हेल्मेटही बदलण्यात येतं. पण असं काहीही झालं नाही. अजिबात वेळ न घालवता सामना सुरू राहिला,’ असं वक्तव्य मांजरेकर यांनी समालोचनादरम्यान केलं.

डोक्याला चेंडू लागल्यानंतरही जाडेजानं ९ धावा केल्या. याचा मोठा फायदा झाला नाही. चेंड लागल्यानंतर दोन-तीन मिनिटांमध्ये भारतीय मेडिकल टीम मैदानात यायला पाहिजे होती, असं झालं असतं तर ही दुखापत विश्वसनीय दिसली असती. आयसीसीनं या नियमांबाबत पुन्हा एकदा विचार करायला हवा, असेही मांजरेकर म्हणाले.