मुंबई : ‘भारतीय संघातील सर्वात वेगवान धावपटू’ या बिरुदाला जोवर कुणी आव्हान देणार नाही, तोपर्यंत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरुस्त असेन, असा दावा महेंद्रसिंह धोनीने माझ्याकडे केला, अशी माहिती भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने दिली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या २०१७ मध्ये झालेल्या विवाह समारंभात दोन वेळा विश्वविजेत्या धोनीशी माझी भेट झाली. त्या वेळी त्याच्या भवितव्याविषयी मी चर्चा केली, असे नामांकित समालोचक मांजरेकर यांनी सांगितले. तेंडुलकर, धोनी यांना मी अजिंक्य क्रिकेटपटू मानतो, असे मांजरेकरने नमूद केले.

२०१९ मध्ये झालेल्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात भारत पराभूत झाल्यापासून धोनी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात धोनी झोकात पुनरागमन करील, असा विश्वास मांजरेकरने व्यक्त केला.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘आयपीएल’ हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीने सरावाला प्रारंभ केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फक्त चार-पाच उत्तम गोलंदाजांचा सामना करणे आव्हानात्मक असते, हे धोनीला माहीत असल्याने तो यशस्वी आहे, असे मांजरेकरने सांगितले.