स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा

स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. याशिवाय पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने दुसरी फेरी गाठली, तर एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा यांना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या हफिझ फैझल आणि ग्लोरिआ इमॅन्युएल या जोडीला सात्त्विक-अश्विनी यांच्या जोडीने २१-१८, २१-१० असे सरळ दोन गेममध्ये नमवले. जानेवारीत झालेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत याच दुसऱ्या मानांकित जोडीने सात्त्विक-अश्विनीला उपांत्य फेरीत हरवले होते. आता दुसऱ्या फेरीत सात्त्विक-अश्विनी यांच्यापुढे इंडोनेशियाच्याच रिनोव्ह रिवाल्दी आणि पिथा मेंतारी या जोडीचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत चिराग शेट्टीच्या साथीने खेळताना सात्त्विकने स्कॉटलंडच्या ख्रिस्तोफर ग्रिमले आणि मॅथ्यू ग्रिमले यांना २१-१८, १९-२१, २१-१६ असे पराभूत केले.

मिश्र दुहेरीतच प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला पराभव पत्करावा लागला. ब्रिटनच्या मार्कस एलिस आणि लॉरेन स्मिथ यांनी अवघ्या ३९ मिनिटांत प्रणव-सिक्की यांना २१-१८, २१-१५ अशी धूळ चारली.

पुरुष एकेरीत अनुभवी श्रीकांतने भारताच्याच समीरवर १८-२१, २१-१८, २१-११ अशी पिछाडीवरून सरशी साधली. ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत श्रीकांतची फ्रान्सच्या थॉमस रॉक्सेलशी गाठ पडणार आहे. नेदरलँड्सच्या मार्क कॅल्जोने प्रणॉयला २१-१९, ९-२१, २१-१७ असे तीन गेममध्ये नमवून त्याचे आव्हान संपुष्टात आणले.