साईप्रणीतचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात

बँकॉक : पुरुष दुहेरीतील भारताची उदयोन्मुख जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी शुक्रवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली; परंतु पुरुष एकेरीत बी. साईप्रणीतला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला, तर मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळणाऱ्या सात्त्विकलाही पराभवाचे तोंड पाहावे लागले.

सात्त्विक-चिराग या बिगरमानांकित जोडीने कोरियाच्या चोई सोलग्यू आणि सीओ सुंग जे यांच्यावर एक तास रंगलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात २१-१७, १७-२१, २१-१९ असा तीन गेममध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला. कारकीर्दीत पहिल्यांदाच सात्त्विक-चिराग यांनी सोलग्यू-सुंग यांना पराभूत केले आहे.

जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या सात्त्विक-चिराग यांच्यासमोर शनिवारी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत कोरियाच्याच को सुंग ह्य़ून आणि शिन बेक चेओल यांचे आव्हान असणार आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी, पुरुष दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत सात्त्विक-चिराग यांनी इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद अर्डिटो यांना फक्त दोन गेममध्ये २१-१७, २१-१९ असे नेस्तनाबूत केले होते. मात्र भारताचे महिला एकेरीतील आव्हान सायना नेहवालच्या पराभवामुळे संपुष्टात आले, तर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांनाही गाशा गुंडाळावा लागला होता.

साईप्रणीत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

पुरुष एकेरीत जपान बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या साईप्रणीतला यंदा उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. जपानच्या सातव्या मानांकित केंटा त्सुनेयामाने साईप्रणीतला दोन गेममध्ये २१-१८, २१-१२ अशी धूळ चारली. साईप्रणीतच्या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले.

सात्त्विक-अश्विनी यांचा पराभव

मिश्र दुहेरीत भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या तिसऱ्या मानांकित युटा वटांबे आणि अरिसा हिसाशिनो या जोडीने सात्त्विक-अश्विनी यांचा फक्त २८ मिनिटांत २१-१३, २१-१५ असा धुव्वा उडवला.