ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची संधी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिळणार आहे. मात्र उजव्या खांद्याची दुखापत व युवा खेळाडूंकडून मिळणारी झुंज हे अडथळे तिला पार करावे लागणार आहेत.

सेरेनाने यंदा विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद मिळवत स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. ग्रँड स्लॅम स्पर्धा हौशीप्रमाणेच व्यावसायिक खेळाडूंसाठी खुल्या झाल्यानंतर ग्राफने ही अजिंक्यपदे मिळवली आहेत. खुल्या स्पर्धाच्या युगात सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवणारी सेरेना पहिली खेळाडू होईल. खुल्या स्पर्धाच्या पूर्वीचा विचार केला तर ती मार्गारेट कोर्टच्या २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या दिशेने ती आणखी एक पाऊल टाकेल.

ग्राफने सलग १८६ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याची कामगिरी केली होती. हा विक्रम मोडण्याचीही सेरेनाला संधी आहे. त्याखेरीज खुल्या स्पर्धाच्या युगात अमेरिकन स्पर्धेतील एकेरीत सर्वाधिक विजेतेपदे मिळवण्याच्या विक्रमाचीही तिला संधी आहे.

‘‘मी कोणत्याही विक्रमासाठी खेळत नसून खेळाचा निखळ आनंद घेण्यासाठी खेळत असते. जर मी विक्रमाचा विचार करीत बसले तर मला झोप लागत नाही. साहजिकच खेळात मी एकाग्रता ठेवू शकत नाही,’’ असे सेरेनाने सांगितले.

लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सेरेनाला विजेतेपद मिळाले होते, मात्र हे विजेतेपद तिला यंदा रिओ येथे टिकवता आले नव्हते. तिसऱ्या फेरीत एलिना स्वितोलिनाने तिला पराभवाचा धक्का दिला होता. सेरेनाला उजव्या खांद्याच्या दुखापतीने ग्रासले आहे.