बांगलादेशचा सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर ICC ने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. एकदिवसीय, टी २० आणि कसोटी क्रिकेट अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक नियमावलीचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याने त्याच्यावर लावण्यात आलेले नियमभंगाचे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावरील बंदीची कारवाई एका वर्षाची (back dated suspension) करण्यात आली. त्यामुळे २९ ऑक्टोबर २०२० रोजी शाकिब पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकतो.

Video : शॉट खेळला पण क्रीजमध्ये यायलाच विसरला… पहा विचित्र ‘रन आऊट’

शाकिब अल हसनला पुढच्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची परवानगी ICC ने दिली आहे. मात्र शाकिबचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होणे जरा कठीणच असल्याचे मत बांगलादेशचे माजी कर्णधार आणि निवड समिती अध्यक्ष हबीबुल बशर यांनी व्यक्त केले आहे. “शाकिबवर बंदी ही धक्कादायक बाब आहे. पण बांगलादेशच्या संघातील खेळाडूंनी हे सारे विसरून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. एक बलवान संघ म्हणून उदयास येणे हे सध्या बांगलादेश संघासाठी महत्त्वाचे आहे. मॅच फिक्सिंगसाठी बुकींनी शाकिबशी संपर्क साधला हे शाकिबने सांगायला हवे होते. पण शाकिबने याबाबत काहीच माहिती दिली नाही हे आम्हा साऱ्यांसाठीच खूपच धक्कादायक होते. त्यामुळे आता शाकिबसाठी क्रिकेटमधील पुनरागमन फारसे सोपे असणार नाही, असे सूचक वक्तव्य बशर यांनी केले.

काय आहे प्रकरण –

ICC च्या कलम २.४.४ अंतर्गत मॅच फिक्सिंगची ऑफर असल्याची माहिती शकिबने ICC च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली नाही. जानेवारी २०१८ मध्ये तिरंगी मालिकेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यातही त्याला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. त्याबाबतची माहितीही त्याने ICC पासून लपवली, असे आरोप शाकिबवर करण्यात आले होते. शकिबने हे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. मात्र त्याच्या बंदीचा काळ २०१८ पासून (back dated suspension) सुरू होणार असल्याने तो २९ ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो.

आयसीसीचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी सांगितले की शाकिबने आपल्यावरील आरोप मान्य करून तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. पण शाकिबकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भरपूर अनुभव आहे. त्याने आयसीसीच्या अनेक शिबिरांना हजेरी लावली आहे. तरीही त्याने नियमांचे उल्लंघन केले हे खूपच दु्र्दैवी आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.