विजयानंतरही स्वित्र्झलडचे भवितव्य अधांतरी; इटली, वेल्स बाद फेरीत

बाकू : युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे इटली आणि स्वित्र्झलड या संघांनी विजय मिळवला. मात्र स्वित्र्झलडचे भवितव्य अद्यापही अधांतरी असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोलफरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले.

बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्र्झलडविरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शकिरीची कमाल पाहायला मिळाली. शकिरीने केलेल्या दोन गोलला हॅरिस सेफेरोव्हिचच्या एका गोलची साथ लाभल्यामुळे स्वित्र्झलडने टर्कीवर ३-१ असे वर्चस्व गाजवले. टर्कीकडून इरफान कॅव्हेसीने एकमेव गोल केला. टर्की तिन्ही लढतींमध्ये पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

वेल्सविरुद्ध बरोबरी पत्करणाऱ्या स्वित्र्झलडला दुसऱ्या लढतीत इटलीने धूळ चारली. त्यामुळे ही लढत जिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य होते. सेफेरोव्हिचने सहाव्याच मिनिटाला पहिला गोल नोंदवून स्वित्र्झलडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मग शकिरीने अनुक्रमे २६ आणि ६८व्या मिनिटाला दोन गोल नोंदवून स्वित्र्झलडचा विजय सुनिश्चित केला. परंतु तरीही ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.

रोम येथे झालेल्या अन्य सामन्यात आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या इटलीने विजयाची हॅट्ट्रिक लगावताना वेल्सवर १-० अशी मात केली. मॅटिओ पेसीनाने २९व्या मिनिटाला इटलीसाठी एकमेव गोल नोंदवला. इटलीने गटात सर्वाधिक नऊ गुण कमावले. गेल्या युरो चषकात उपांत्य फेरी गाठणाऱ्या वेल्सने यंदाही बाद फेरीत प्रवेश केला आहे.

गुणतालिका गट ‘अ’

संघ            सा     ज     प      ब      गु

इटली          ३      ३      ०      ०      ९

वेल्स           ३      १      १      १      ४

स्वित्र्झलड   ३      १      १      १      ४

टर्की            ३      ०      ३      ०      ०

दोन गटांचे चित्र आज स्पष्ट होणार

युरो चषकात सोमवारी एकूण चार लढती होणार आहेत. यांपैकी ‘ब’ गटात बेल्जियम विरुद्ध फिनलंड आणि रशिया विरुद्ध डेन्मार्क यांच्यात सामने होतील. बेल्जियमने दोन्ही लढती जिंकून बाद फेरीतील स्थान पक्के केले असून दुसऱ्या स्थानासाठी अन्य तीन संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. डेन्मार्कने दोन्ही सामने गमावले आहेत.

‘क’ गटातून नेदरलँड्सने सलग दोन विजयांसह बाद फेरी गाठली असून त्यांचा शनिवारी उत्तर मॅसेडोनियाशी मुकाबला असेल. मॅसेडोनियाने दोन्ही लढती गमावल्याने त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. युक्रेन आणि ऑस्ट्रिया यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन सामन्यांत तीन गुण असल्यामुळे या लढतीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. उभय संघ युरो चषकात तिसऱ्यांदा आमनेसामने येतील.