चेन्नई : प्रत्येक सामन्यागणिक शिवम दुबेच्या आत्मविश्वासात वाढ होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार अष्टपैलू खेळाडूची त्याच्याकडे क्षमता आहे, असे मत भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले आहे.
तिरुवनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चौफेर फटकेबाजी करीत फक्त ३० चेंडूंत ५४ धावांची खेळी साकारल्यानंतर दुर्बे चर्चेत आला. या खेळीत त्याने चार उत्तुंग षटकार खेचले होते. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती.
‘‘दुबेचे भवितव्य उज्ज्वल आहे. प्रत्येक सामन्यागणिक तो विकसित होतो आहे. मुंबईत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुबेने पहिल्या षटकात १९ धावा दिल्या. परंतु तरीही कर्णधार विराट कोहलीने विश्वास दाखवत त्याच्याकडे चेंडू दिला. मग त्याने दुसऱ्या षटकात ११ आणि तिसऱ्या षटकात २ धावा देत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला,’’ असे अरुणने सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेले सातत्य वेगवान गोलंदाज दीपक चहर दाखवत आहे, असे अरुण यांनी सांगितले. ‘‘दीपकने ‘आयपीएल’मध्येही आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. दोन्ही बाजूंनी चेंडू वळवण्यात तो वाकबदार आहे. धिमे उसळणारे चेंडू, यॉर्कर्स ही त्याच्या भात्यामधील हुकमी अस्त्रे आहेत,’’ असे अरुणने दीपकच्या गोलंदाजीचे कौतुक केले.