नवी दिल्ली : अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी भारताची अव्वल नेमबाज राही सरनोबत टोक्यो ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असली तरी तिच्या मार्गात सरकारी नोकरीतील सेवानियमांचे अडथळे येत आहेत. राज्य शासनाच्या महसूल खात्यात उपजिल्हाधिकारी पदाची नोकरी असूनदेखील  आर्थिक चणचण भासत असल्याचा दावा राहीने केला आहे.

कोल्हापूरची २८ वर्षीय नेमबाज राहीने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतदेखील ५० लाखांचे बक्षीस आणि राज्य शासनाकडून २० लाखांचे इनाम मिळवले होते. त्यापूर्वी राहीने २०१३मध्ये विश्वचषकात सुवर्ण आणि २०१४च्या राष्ट्रकुलचे सुवर्ण अशी कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर राही दुखापतीमुळे त्रस्त असल्याने दीड वर्षांचा काळ खेळापासून दूर होती. त्यामुळे तिने मंगोलियाची ऑलिम्पिक पदकविजेती मुनखब्यार दोर्जसुरेन हिला खासगी प्रशिक्षक म्हणून नेमले होते. मात्र तिला वर्षांला ५० लाख रुपये प्रशिक्षण शुल्क द्यावे लागत असल्याने आर्थिक चणचणीपोटी तिला अजून किती काळ ठेवता येईल, ते सांगता येत नसल्याचे राहीने म्हटले आहे.

सप्टेंबर २०१७पासून सरावासाठी ती बिनपगारी रजेवर आहे. लागोपाठच्या स्पर्धाची तयारी आणि स्पर्धा नसतील त्यावेळी सरावावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयास करण्यावर ती भर देते. आगामी ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अजून किमान सात महिने ते वर्षभर प्रशिक्षकांना नेमावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तो अतिरिक्त ५० लाखांचा खर्च कसा पेलायचा? प्रायोजक कुठून शोधायचे असा प्रश्न राहिला पडला आहे. त्यातून लवकरात लवकर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार असल्याचे राहीने नमूद केले.