चिवट खेळ करत पहिली कसोटी अनिर्णित राखल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघ दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या कसोटीत अँजेलो मॅथ्यूजने दोन्ही डावात दिमाखदार प्रदर्शन करत श्रीलंकेला संकटातून बाहेर काढले होते. त्याच्यासह कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांच्यावर श्रीलंकेच्या फलंदाजीची भिस्त आहे. सुरंगा लकमल आणि शमिंदा इरंगा यांच्या सातत्याला बळींची जोड मिळणे आवश्यक आहे. पाकिस्तानसाठी मिसबाह उल हक आणि युनूस खान फलंदाजीत आधारस्तंभ आहेत. दुबईच्या मैदानावर शानदार प्रदर्शन करणाऱ्या सईद अजमलकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. अजमलसह जुनैद खान आणि बिलावल भट्टी यांच्या कामगिरीकडे पाकिस्तानचे लक्ष आहे.

‘जोराई दहिसर-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा
मुंबई : मुंबई आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेतर्फे ‘जोराई दहिसर-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन, विद्यामंदिर शाळेसमोर, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पूर्व) येथे ११ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता ही स्पर्धा होणार आहे. ५५, ६०, ६५, ७०, ७५ आणि ७५ किलोपेक्षा अधिक अशा वजनी गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धेपूर्वी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत वजन तपासणी होणार आहे. अधिक माहितीसाठी सुनील शेगडे ९२२३३४८५६८, संजय चव्हाण ९६१९६१९०६० यांच्याशी संपर्क करावा.

सागर कातुर्डे ‘युवा सेना-श्री’चा मानकरी
मुंबई : मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित केलेल्या ‘युवा सेना-श्री’ शरीरसौष्ठव स्पध्रेत सागर कातुर्डे किताबाचा मानकरी ठरला. सर्वोत्तम शरीरसंपदेचा मान स्वप्नील नेवाळकरने पटकावला. गटवार निकाल : ५५ किलो : १. सुनील सकपाळ, २. किशोर कदम, ३. फरहान सय्यद. ६० किलो : १. गजानन पालव,२. अरुण पाटील, ३. प्रदीप झोरे. ६५ किलो : १. सिद्धेश धनावडे, २. दिनेश शिंदे, ३. नितीन म्हात्रे. ७० किलो : १. श्रीनिवास खारवी, २. उत्तमसिंघ कंडियाल, ३. मनोज पाटील. ७५ किलो : १. सागर कातुर्डे, २. सचिन पाटील, ३. स्वप्नील आतैई. ७५ किलोपेक्षा अधिक : १. सुजीत जाधव, २. रोहित पिल्लय, ३. किरण मुलमुले.

माटुंगा जिमखाना-दादर क्लबतर्फे स्नूकर स्पर्धा
मुंबई : माटुंगा जिमखाना आणि दादर क्लबतर्फे खुल्या स्नूकर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते २४ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. शहरातील अव्वल स्नूकरपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्वोत्तम ५ फ्रेमच्या पद्धतीप्रमाणे प्राथमिक फेरीच्या लढती होणार आहेत.

दामोन हिल मुंबई मॅरेथॉनचा ‘सदिच्छा दूत’
मुंबई : फॉम्र्युला-वन शर्यतीचा माजी विश्वविजेता दामोन हिल मुंबई मॅरेथॉन शर्यतीचा सदिच्छा दूत (ब्रँण्ड अ‍ॅम्बॅसेडर) असणार आहे. १९९६मध्ये विश्वविजेतेपद पटकावणारा दामोन हा मायकेल शूमाकरचा सर्वात दमदार प्रतिस्पर्धी समजला जात असे. फॉम्र्युला-वन कारकिर्दीत दामोनने २२ ग्रां.प्रि.मध्ये अव्वल स्थानावर कब्जा केला तर ४२ वेळा अव्वल तीनमध्ये स्थान पटकावले. फॉम्र्युला-वनचे माजी विजेते ग्रॅहम हिल यांचा मुलगा असलेल्या दामोनने प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आपली कारकीर्द घडवली.

व्होडाफोन टीवॉक गोल्फ स्पर्धा १८ जानेवारीपासून
मुंबई : व्होडाफोन टीवॉक कॉर्पोरेट गोल्फ मालिका १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. चार शहरात होणाऱ्या या स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबादारी निम्बस स्पोर्ट्सकडे सोपवण्यात आले आहे. १८ जानेवारीला मुंबईत बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब येथे मालिकेची सुरुवात होणार आहे. हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरू ही स्पर्धेची अन्य ठिकाणे आहेत.

महाराष्ट्राची पंजाबवर ४४ धावांची आघाडी
मोहाली : पंजाबच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनी झुंजार खेळ करूनही महाराष्ट्राने सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या डावात ४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. पंजाब क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या आहेत. त्यास उत्तर देण्यासाठी पंजाबने ४ बाद ८७ धावांवर पहिला डाव मंगळवारी पुढे सुरू केला. महाराष्ट्राचे गोलंदाज त्यांना २५० धावांमध्ये रोखून धरतील अशी अपेक्षा होती. तथापि पंजाबच्या फलंदाजांनी चिवट झुंज देत महाराष्ट्राच्या या आशांना सुरुंग लावला. त्यांनी आणखी २५८ धावांची भर घातली. त्याचे श्रेय टी. एस. कोहली (९ चौकारांसह ८०), ए. बी. गुप्ता (९ चौकारांसह ६०), एस. टी. कौल (५ चौकार व २ षटकारांसह ५२) यांच्या दमदार खेळास द्यावे लागेल. गुप्ता व कौल यांनी सातव्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. पंजाबचा डाव ३४० धावांवर आटोपला. महाराष्ट्राकडून निकित धुमाळ याने तीन गडी बाद केले, तर शुभम रांजणे व राहुल त्रिपाठी यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. उर्वरित ५.२ षटकांत महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद ७ धावा केल्या.

क्रिकेट : परवेझ खानचे द्विशतक हुकले
मुंबई : मुंबई शालेय क्रीडा संघटना आणि मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अंजुमन इस्लाम शाळेच्या परवेझ खानचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र त्याच्या १९९ धावांच्या खेळीच्या जोरावर अंजुमन संघाने ३५९ धावांची मजल मारली. लिलावतीबाई पोद्दार संघाची ३ बाद ७ अशी अवस्था आहे. वळसंगकरच्या शतकी खेळीच्या आधारे आयईएस व्ही.एन.सुळे गुरुजी संघाने ३७९ धावा केल्या. सेंट झेव्हियर बॉइज अकादमीची बिनबाद ९ अशी स्थिती आहे. अल बरकत, कुर्ला संघाच्या अभिषेक पांडेने ७ बळी घेतल्याने पार्ले टिळकचा डाव ९१ धावांत गडगडला. अल बरकतने ३ बाद १६५ अशी मजल मारली आहे. स्वामी विवेकानंद संघाविरुद्ध खेळताना आयईएस राजा शिवाजी विद्यालय दादर संघाचा डाव ११० धावांत आटोपला. अरुण मंडलिकने शतक झळकावल्याने रिझवी स्प्रिंगफिल्डने ३१६ धावांचा डोंगर उभारला.

१ फेब्रुवारीला अखिल भारतीय एन्डय़ुरो स्पर्धा
पुणे : नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेली १२वी अखिल भारतीय एन्डय़ुरो साहसी क्रीडा स्पर्धा १ फेब्रुवारीला होणार आहे. यंदा दोनशे संघांचा सहभाग अपेक्षित आहे. सिंहगड, पानशेत, माणगाव या परिसरात होणाऱ्या या स्पर्धेत साधारणपणे सव्वाशे किलोमीटर सायकलिंग, तेवढेच पदभ्रमण तसेच कयाकिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक संघातील तीन खेळाडूंमध्ये किमान एक मुलगी असणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमधील स्पर्धक सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी हौशी, महाविद्यालयीन, शालेय, कॉपरेरेट, वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षक, पोलीस, खुला गट, कौटुंबिक सदस्य, ४० वर्षांवरील प्रौढ असे दहा विभाग ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी सात लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अपूर्वा जडये (८१४९१६०४९९) किंवा अक्षय दोशी (७७९८७५६९८०) यांच्याकडे संपर्क साधावा.