इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी रंगतदार अवस्थेत
हेडिंग्ले : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. न्यूझीलंडने दुसरा डाव ८ बाद ४५४ धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. ब्रॅडले वॉटलिंगने सर्वाधिक १२० धावांची खेळी साकारली. इंग्लंडला विजयासाठी ४५५ धावांचे लक्ष्य मिळाले. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने बिनबाद ४४ अशी मजल मारली. पावसामुळे चौथ्या दिवशी दोन सत्रांचा खेळ वाया गेला. पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लडला विजयासाठी ४११ धावांची आवश्यकता आहे तर न्यूझीलंडला १० विकेट्स घेणे आवश्यक आहे. इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वरुण आरोन विश्वचषकात हवा होता-ग्लेन मॅग्रा
मुंबई : वरुण आरोन वेगाने गोलंदाजी करतो, चेंडू स्विंगही करतो. प्रदीर्घ काळासाठी तो भारतीय संघाचा भाग असेल. मात्र तरीही विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात त्याची निवड न होणं आश्चर्यकारक होते असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राने व्यक्त केले. वरुण आणि उमेश यादव भारतीय गोलंदाजीचे भविष्य आहे. या दोघांनी वेग कमी करण्यापेक्षा, आहे त्याच वेगात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा सराव वाढवला पाहिजे असे मॅग्राने सांगितले.

क्रिकेट : रिझवी महाविद्यालय अंतिम फेरीत
मुंबई : मुंबई विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत रिझवी महाविद्यालयाने अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना झुनझुनवाला संघाचा डाव ११६ धावांतच आटोपला. अरुण यादवने सर्वाधिक ३० धावा केल्या. रिझवीच्या आदित्य धुमाळने १९ धावांत ६ बळी घेतले. अंकुश जैस्वालने ३८ धावांत ४ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना रिझवी संघाने एका विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. प्रतीक प्रभूने ५२ तर पुनीत त्रिपाठीने ५२ धावांची खेळी केली.

कबड्डी : महाराष्ट्राच्या पुरुष संघाला जेतेपद
मुंबई : राजनंदगाव, छत्तीसगढ येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने जेतेपदाला गवसणी घातली. महिला संघाला मात्र तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुष गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने यजमान छत्तीसगढचा ५९-२१ असा धुव्वा उडवला. काशिलिंग आडके, महेंद्र रजपूत यांच्या झंझावाती खेळाने छत्तीसगढला निष्प्रभ ठरवले. महिला गटात उपांत्य फेरीच्या लढतीत छत्तीसगढने महाराष्ट्रावर २२-११ असा विजय मिळवला.

खो-खो : महात्मा गांधी अकादमी अजिंक्य
मुंबई : ठाण्याच्या स्पोर्टिग क्लबतर्फे आयोजित विभागीय निमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेत उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने जेतेपदावर नाव कोरले. गांधी अकादमीने विहंग क्रीडा मंडळावर २०-१६ असा विजय मिळवला. राहुल साळुंखेच्या नेतृत्वाखाली खेळताना गांधी अकादमीचे हे तिसरे जेतेपद आहे. मध्यंतराला महात्मा गांधी अकादमीकडे ९-८ अशी आघाडी होती. चेतन गवसने २ मिनिटे संरक्षण करताना ४ गडी बाद केले. दीपेश मोरेने २.१० मिनिटे आणि १.१० मिनिटे संरक्षण करताना २ गडी बाद केले. यामित खानने ६ गडी बाद केले. चेतन गवसची सवरेत्कृष्ट आक्रमकपटू म्हणून तर महेश शिंदेची सवरेत्कृष्ट संरक्षकपटू म्हणून निवड झाली. दीपेश मोरे सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ठरला.

टेटे : सनील, अमनला सर्वाधिक भाव
मुंबई : सनील शेट्टी आणि अमन बगलू यांना मुंबई टेबल टेनिस सुपर लीगसाठी झालेल्या लिलावात सर्वाधिक भाव मिळाला. सनीलला कुल स्मॅशर्सने तर अमनला मुंबई टायटन्स संघाने आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. खार जिमखाना येथे २० आणि २१ जून रोजी होणाऱ्या या लीगमध्ये एकूण आठ संघ असणार आहेत. प्रत्येक संघात चार खेळाडू असणार आहेत. संघ आणि खेळाडू : कुल स्मॅशर्स- सनील शेट्टी, अश्विन एस, अंतरा जग्गी, संजना चौधरी. मुंबई टायटन्स- अमन बगलू, सेनहोरा डिसुझा, श्याम पुरोहित, विधी धूत. सुप्रीम फायटर्स- रवींद्र कोटियन, पार्थव केळकर, द्युती पत्की, मनुश्री पाटील, ऐस- शुभम आंब्रे, आश्लेषा त्रेहान, अदिती सिन्हा, जिग्नेश राहतवाल, हाय टाइड- हर्ष मणियार, मृण्मयी म्हात्रे, सृष्टी हलेनगडी, मंदार हर्डीकर, सेंच्युरी- रायस अल्बुकर्क, चार्वी कवळे, शौर्य पेडणेकर, प्रांजल शिंदे. ब्लॉक बस्टर्स- निशांत कुलकर्णी, श्वेता पार्टे, ऋत्विक पांदिरकर, मानसी चिपळूणकर किंग पाँग- दिव्या महाजन, ओंकार तारगोळकर, मुदित दाणी, तन्विता ठाकूर

राज्य जिम्नॅस्टिक्स संघटनेची कार्यकारिणी जाहीर
मुंबई : राज्य हौशी जिम्नॅस्टिक संघटनेच्या ४९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील चार वर्षांसाठी कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये गौतम पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. कार्यकारिणी- गौतम पाटील (अध्यक्ष), धनंजय दामले, सुभाष भांडारकर, कृष्णराव जाधव, तुळशीराम खडके, नंदन वेंगुर्लेकर, सतीश सेठ, बाळू ढवळे (सर्व उपाध्यक्ष), संजय केळकर (कार्याध्यक्ष), सविता मराठे (सरचिटणीस), भूषण बर्वे (खजिनदार), दीपक सावंत, मंदार म्हात्रे, संदीप आढाव, विजय रोकाडे, अजित शिंदे, विजय पाहूरकर (सर्व सहसचिव), आशीष सावंत, अनिल सहारे, राजेंद्र बनमारे, मंगेश इंगळे, राकेश केदारे, मिथिल भंडारे (सर्व सदस्य).
फुटबॉल : एअर इंडियाने जेतेपद राखले
मुंबई : मुंबई जिल्हा फुटबॉल संघटना लीगच्या एलिट डिव्हिजनमध्ये एअर इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत जेतेपद कायम राखले. एअर इंडिया आणि ओएनजीसी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. ओएनजीसीतर्फे तारिफ अहमदने तर एअर इंडियातर्फे विजिथ शेट्टीने प्रत्येकी एक गोल केला. ३९ गुणांसह एअर इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ओएनजीसीने २९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले.

पिकलबॉल : अनिकेत, एकता विजयी
मुंबई : मुंबई जिल्हा पिकलबॉल स्पर्धेत पुरुषांमध्ये अनिकेत दुर्गावली तर महिलांमध्ये एकता सपकाळ यांनी जेतेपदाची कमाई केली. अनिकेतने आशीष महाजनचा ११-३, ११-६ असा पराभव केला. एकताने कादंबरी पाटीलवर ६-११, ११-५, ११-४ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीत मनीष राव आणि सचिन मांद्रेकर यांनी भूषण पोतनीस आणि आशोतोष मदभावी जोडीवर ११-८, ५-११, ११-५ अशी मात केली. महिला दुहेरीत प्रीती गुप्ता- अंकिता बालेकर जोडीने तर मिश्र दुहेरीत अनिकेत दुर्गावली आणि भाग्यश्री भंडारी जोडीने जेतेपद पटकावले. या स्पर्धेद्वारे २७ आणि २८ जून रोजी पानिपत येथे होणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. संघ- अनिकेत दुर्गावली, आशीष महाजन, मनीष राव, सचिन मांजरेकर, एकता सकपाळ, कादंबरी पाटील, प्रीती गुप्ता, अंकिता बालेकर, भाग्यश्री भंडारी.