यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कोणत्याही सरावाविना मैदानात उतरावे लागले, तसे यापुढेही घडले तर महेंद्रसिंह धोनीसाठी चांगली कामगिरी करणे कठीण जाईल, असे मत महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.

चेन्नई सुपर किंग्जला ‘आयपीएल’च्या ११ प्रयत्नांमध्ये पहिल्यांदाच बाद फेरीत स्थान मिळवता आले नाही. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फे रीच्या लढतीनंतर धोनी पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. त्याला १४ सामन्यांमध्ये फक्त २०० धावाच करता आल्या.

‘‘प्रत्येक वर्षी ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचे धोनीने ठरवले तर त्याला चांगली कामगिरी करणे कठीण जाईल. वयाच्या ३९व्या वर्षी अधिक खेळण्याची लालसा ठेवण्याचा विचार योग्य नाही. १० महिने किंवा वर्षभरानंतर क्रिकेट खेळल्यावर काय होते, ते आपण पाहिलेच आहे. त्यामुळे धोनीने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून नंतरच ‘आयपीएल’मध्ये खेळण्याचे ठरवावे,’’ असे कपिल देव यांनी सांगितले.