जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धा

भारताची युवा बॉक्सिंगपटू सोनियाने मोरोक्कोच्या तोऊजानी दोआवर निर्विवाद वर्चस्व मिळवत महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

दिल्लीतील खाशाबा जाधव सभागृहात झालेल्या या लढतीत ५७ किलो वजनी गटात खेळताना सोनियाने प्रारंभापासूनच अफलातून खेळ केला. हा सामना सोनियाने २९-२८, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असा ५-० फरकाने जिंकला.

हरयाणाच्या भिवानी या बॉक्सिंगची परंपरा लाभलेल्या जिल्ह्य़ातील निमरी या खेडय़ातील शेतकरीकन्या असलेल्या सोनियाने प्रारंभी अगदी बचावात्मक खेळ केला. त्यानंतर काहीसा खुला पवित्रा घेत सोनियाने प्रतिस्पर्धी बॉक्सरला आव्हान दिले.

पहिल्या फेरीत सोनियाने काही डाव्या ठोशाचे जोरदार फटके लगावत आणि एक सरळ तोंडावर फटका लगावत दोआला बचावात्मक पवित्रा स्वीकारण्यास भाग पाडले. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतदेखील सोनियाने डाव्या हाताचे ठोसे लगावणे सुरूच ठेवले. त्याचबरोबर उजव्या हाताने काही अपारंपरिक ठोसे अगदी चेहऱ्याच्या मध्यभागी लगावत गुण मिळवण्याचे धोरण कायम ठेवले. तिसऱ्या फेरीत तर पंचांना दोआला बाजूला करावे लागले. अखेरीस सोनियाने हा सामना ५-० असा आरामात जिंकून घेत स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोनियाला पुढील फेरीत माजी जगज्जेती बल्गेरियाची बॉक्सिंगपटू स्टॅनिमिरा पेट्रोवाशी दोन हात करावे लागणार आहेत.

२०१६ साली झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यापासून सोनिया उदयास आली. त्यानंतर तिने गतवर्षी सर्बिया चषक स्पध्रेत सुवर्णपदक पटकावले. तर यंदा अहमद कोमेरत बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील या सामन्याबाबत सोनियाने तिचे धोरण उलगडून सांगितले.

दरम्यान, स्टॅनिमिरा पेट्रोवाने अमेरिकेच्या रिआना रिओसवर एकतर्फी मात केली. रिआना ही अमेरिकेच्या लष्करातील सरजट असल्याने ती पेट्रोवाला तुल्यबळ लढत देईल, असा अंदाज होता. मात्र, पेट्रोवाने तिला सहज पराभूत केले.

प्रतिस्पर्धी बॉक्सरपासून प्रारंभी अंतर ठेवायचे आणि नंतर ठोसे लावायचे असा मी खेळ केला. तिसऱ्या फेरीत तर दोन्ही हातांनी ठोसे लगावण्यास प्रारंभ केला. मी चांगला खेळ करीत असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितल्याने माझ्या उत्साहात भर पडली आहे.

-सोनिया