बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे पुढील ३ जन्म त्याला काय करायचे आहे याबद्दलची इच्छा गांगुलीने व्यक्त केली. गांगुलीने भारतीय संघाकडून खेळतानाचा एक जुना फोटो शेअर केला, त्यामध्ये तो निळ्या जर्सीमध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत.
”पुढील तीन जन्मांसाठी मी हे करू शकलो असतो”, असे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. गांगुली हा भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो ११३६३ धावा काढण्यात यशस्वी झाला आहे. यात त्याने २२ शतके आणि ७२ अर्धशतके ठोकली. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असून यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.
View this post on Instagram
१९९२ मध्ये पदार्पण
गांगुलीने १९९२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याला केवळ तीन धावा करता आल्या आणि पुढील चार वर्षे तो संघाबाहेर राहिला. गांगुलीने २० जून १९९६ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.