जमैकाचा धावपटू युसेन बोल्ट आणि फॉम्र्युला-वनमधील रेड बुल संघाचा ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल यांच्यात बरेचसे साम्य आहे. दोघेही वेगमानव. दोघांची कारकीर्दही देदीप्यमान. फरक फक्त इतकाच की, बोल्ट आपल्यातील अंगभूत कौशल्याच्या जोरावर चित्त्याच्या वेगाने पळत सर्वाना अचंबित करून टाकतो आणि वेटेल हा तंत्रज्ञानाच्या अद्भुत अदाकारीने कारवर अचूक नियंत्रण राखून वेगावर स्वार होत सर्वाना वेगाची अनुभूती देऊन जातो. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत वेटेलला सलग चौथे विश्वविजेतेपद खुणावत आहे.
वेटेलसाठी चौथे विश्वविजेतेपद पटकावण्याची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. तो योग सुदैवाने भारतातच जुळून येणार आहे. मायकेल शूमाकर (सात जेतेपदे) आणि जुआन मॅन्युएल फँगियो (पाच जेतेपदे) या महान ड्रायव्हर्सच्या पंक्तीत वेटेल स्थान मिळवणार आहे. जर्मनीने जगाला दिग्गज फॉम्र्युला-वन ड्रायव्हर्सची फौज दिली आहे. त्यापैकीच शूमाकर आणि वेटेल हे दोन रथी-महारथी. शूमाकर यांच्याकडूनच मार्गदर्शनाचे धडे घेणाऱ्या वेटेलने आपल्या वेगाने गेल्या चार मोसमांवर वर्चस्व गाजवले आहे. २०१३चा मोसमही त्याला अपवाद नव्हता. या मोसमात तब्बल नऊ शर्यती जिंकत वेटेलने आपल्या गुणवत्तेची छाप पुन्हा पाडली. पहिल्या टप्प्यात चार शर्यती जिंकल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लागोपाठ पाच शर्यती जिंकून वेटेल विश्वविजेतेपदाच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन ग्रां. प्रि.वर दोन्ही वर्षे मोहर उमटवणारा वेटेल हॅट्ट्रिकसह विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक आहे.
वेटेलला शर्यत देणारा एकही ड्रायव्हर सध्या उपलब्ध नाही. याचे कारण म्हणजे रेड बुलकडे असलेला अमाप पैसा आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान. वेटेल हा फर्नाडो अलोन्सो, लुइस हॅमिल्टन आणि किमी रायकोनेन यांच्याप्रमाणे फॉम्र्युला-वनसाठी लागणारा जिगरबाज, लढवय्या ड्रायव्हर नाही. तो फक्त ‘रोबोट’ आहे, असा मतप्रवाह आहे. फॉम्र्युला-वनमधील एका मोठय़ा संघमालकाचेही हेच मत आहे. फॉम्र्युला-वनमध्ये जो संघ सर्वात जास्त पैसा ओततो, तोच विश्वविजेता ठरतो, हे सर्वज्ञात आहे. रेड बुलकडे पैशांची वानवा नाही. आतापर्यंत रेड बुलने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. त्यातच कधीही हार न मानण्याची वृत्ती असलेला अभियंता एड्रियन निवे याने रेड बुलला सर्वोत्तम तंत्रज्ञानाची जोड उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच फॉम्र्युला-वन शर्यतींवर सध्या रेड बुलचे अधिराज्य आहे. वेटेलने फक्त आपल्यातील कौशल्याने, सातत्यपूर्ण कामगिरी करत त्यावर शिक्कामोर्तब केले. कमी बजेट असलेल्या संघाची कार घेऊनही मी विश्वविजेतेपद जिंकून दाखवू शकतो, हा वेटेलचा आत्मविश्वास सर्व काही सांगून जातो. पण वेटेलने केलेली कामगिरी दुर्लक्षित करून चालणार नाही. ३५ शर्यतींमध्ये विजय, ५८ वेळा पहिल्या तिघांत स्थान, ४२ वेळा पोल पोझिशन हे महानतेची साक्ष देणारे आहे. पुढील वर्षी भारतीय चाहत्यांना फॉम्र्युला-वनचा अनुभव घेता येणार नाही, पण या वादविवादात रंगण्यापेक्षा आपण वेटेलच्या विश्वविजेतेपदाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी सज्ज होऊया!