करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होण्याची चिन्हे आहेत.

‘आयपीएल’चे सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यासंदर्भात येत्या शनिवारी प्रशासकीय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहेत. त्यानंतर ‘बीसीसीआय’चे धोरण स्पष्ट होऊ शकेल. ‘आयपीएल’च्या १३व्या हंगामाला २९ मार्चपासून मुंबईत प्रारंभ होणार होता. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्य शासनांनी अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या सामन्यांसंदर्भात चिंता प्रकट केली आहे.

क्रीडा मंत्रालयाने क्रिकेटसह सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून क्रीडा स्पर्धाना मोठय़ा प्रमाणातील प्रेक्षकांची गर्दी टाळावी, असे निर्देश दिले आहेत. ‘‘कोणत्याही क्रीडा स्पर्धाना मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. मात्र स्पर्धा घेण्यास कोणतीही हरकत नाही,’’ असे क्रीडा सचिव राधेश्याम जुलनिया यांनी सांगितले.

करोनामुळे भारतात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आणि इंडियन खुली गोल्फ स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, तर इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा रिकाम्या मैदानावर होणार आहे.

परदेशी खेळाडूंचा सहभाग १५ एप्रिलनंतरच

सरकारने पर्यटक व्हिसासाठी निर्बंध घातल्यामुळे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत ‘आयपीएल’मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. केंद्र सरकारने बुधवारी राजनैतिक अधिकारीोणिकर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्व पर्यटक व्हिसा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केले आहेत. ‘आयपीएल’साठी ६० परदेशी खेळाडू आणि मार्गदर्शक करारबद्ध आहेत. ‘‘परदेशी खेळाडूंना ‘आयपीएल’साठी भारतात येताना व्यावसायिक व्हिसा घ्यावा लागतो. परंतु सरकारच्या निर्देशामुळे त्यांना ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा १३वा हंगाम पुढे ढकलण्याच्या याचिकेवरील तातडीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सुटीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि अनिरुद्ध बोस यांनी याचिकाकर्त्यांला होळीच्या सुटीनंतर १६ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे नियमित खंडपीठ सुरू होईल, तेव्हा सादर करण्याचे निर्देश दिले.

लखनौ, कोलकाता येथील एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरित दोन एकदिवसीय सामने करोनाच्या संसर्गामुळे प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवणार आहेत. १५ आणि १८ मार्च रोजी अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे हे दोन सामने खेळवण्यात येणार असून, बंगाल क्रिकेट संघटनेने तिकीट विक्री स्थगित केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले. ‘‘भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका सुरू झाल्याने सामने पुढे ढकलणे सध्या अशक्य आहे. परंतु उर्वरित दोन्ही लढती रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवून मोठय़ा प्रमाणावर जमणारी गर्दी टाळण्यासाठी ‘बीसीसीआय’ प्रयत्नशील राहील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘आयएसएल’चा अंतिम सामना प्रेक्षकांविना!

नवी दिल्ली : करोनाच्या धास्तीमुळे अ‍ॅटलेटिको कोलकाता एफसी आणि चेन्नईयन एफसी यांच्यात खेळवला जाणारा इंडियन सुपर फुटबॉल लीगचा (आयपीएल) अंतिम सामना आता प्रेक्षकांविनाच रंगणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानंतर फतोर्डा, मडगांव येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा हा सामना आता बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड या संयोजकांनी घेतला आहे. खेळाडू, चाहते आणि साहाय्यक प्रशिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असेही संयोजकांनी कळवले आहे. १४ मार्च रोजी अंतिम लढत रंगणार आहे.

विश्वचषकातील अंतिम लढतीच्या साक्षीदाराला करोनाची लागण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ८ मार्च रोजी झालेला आयसीसी महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्याचा थरार ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवणाऱ्या चाहत्यालाच करोनाची लागण झाली आहे. ‘‘मेलबर्न क्रिकेट मैदानावर उपस्थित असलेल्या चाहत्यालाच करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. मात्र त्याच्यामुळे इतरांना करोनाचा संसर्ग झालेला नाही. आरोग्य आणि मनुष्य सेवा विभागाने या व्यक्तीवर पुढील उपचार करण्याचे आदेश दिले आहेत,’’ असे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

भारतीय बॉक्सर जॉर्डनहून मायदेशी रवाना

भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकचे नऊ स्थान निश्चित करणारे भारताचे बॉक्सर जॉर्डनहून मायदेशी परतले. जवळपास १३ बॉक्सर आणि तितक्याच साहाय्यक प्रशिक्षकांची करोनाबाबतची चाचणी केल्यानंतर त्यांना मायदेशी रवाना होण्याची परवानगी देण्यात आली. आतापर्यंत भारतीय बॉक्सर २६ फेब्रुवारीपर्यंत इटलीत सराव करत होते. पण आता त्यांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘‘केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच बॉक्सर मायदेशी परतणार आहेत. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत त्यांना आपल्या घरातच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत,’’ असे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांनी सांगितले.

रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिका स्थगित!

* सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश असलेल्या रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिका स्थगित करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी खेळाडू आणि संयोजकांमध्ये याविषयी प्रदीर्घ चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

* एकाच ठिकाणी लोकांनी गर्दी करू नये, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाने दिल्यानंतर संयोजकांनी पुण्याच्या गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवरील सर्व सामने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयोजित करण्याचे ठरवले होते. अंतिम सामनाही याच मैदानावर खेळवण्यात येणार होता.

* आता ही स्पर्धा खेळाडूंच्या उपस्थितीनुसार मे किंवा ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. मुथय्या मुरलीधरन, मार्वन अट्टापटू आणि रंगना हेराथ हे खेळाडू श्रीलंकेला रवाना झाले असून अन्य खेळाडू शुक्रवारी आपापल्या देशात रवाना होणार आहेत.

रणजी करंडकाचा अंतिम दिवसही प्रेक्षकांविना

बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीचा शेवटचा दिवस प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे. विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये कडवी चुरस रंगलेली असताना अंतिम दिवशी चाहत्यांना हा थरार अनुभवता येणार नाही.

जागतिक स्पर्धानाही फटका

युव्हेंटसचा बचावपटू रुगानीला करोनाची लागण

मिलान : युव्हेंटस आणि इटलीचा बचावपटू डॅनियल रुगानी याला करोनाची लागण झाली आहे, असे युव्हेंटसने स्पष्ट केले आहे. रुगानीशी संपर्कात असलेल्या सर्वाचीच आता चाचणी करण्यात येणार आहे. रुगानी जवळपास सात वर्षे युव्हेंटसकडून खेळत आहे. ‘‘रुगानीला करोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर क्लबने पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व स्पर्धात्मक हालचाली बंद केल्या आहेत. आता पुढील पावले उचलण्याचे क्लबने ठरवले आहे,’’ असेही युव्हेंटसने सांगितले.

खेळाडूलाच करोनाची लागण झाल्याने ‘एनबीए’चे सर्व सामने रद्द

लॉस एंजेलिस : उताह जॅझ संघातील खेळाडूला करोनाची लागण झाल्यामुळे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात ‘एनबीए’ या अमेरिकेतील व्यावसायिक बास्केटबॉल लीगचा संपूर्ण मोसम रद्द करण्यात आला आहे. ‘‘पुढील आदेश मिळेपर्यंत ‘एनबीए’चे कोणतेही सामने खेळवण्यात येणार नाहीत. करोना विषाणूंवर मात कशी करता येईल, यासाठी आता ‘एनबीए’ प्रयत्नशील राहील,’’ असे ‘एनबीए’कडून सांगण्यात आले. या खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरी अमेरिकन प्रसारमाध्यमांनी रुडी गोबर्ट या खेळाडूला करोनाची लागण झाल्याचे प्रसिद्ध केले आहे.

ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीतून मॅकलॅरेनची माघार

संघातील सदस्याला करोनाची लागण झाल्यामुळे मॅकलॅरेन संघाने मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन ग्रा. प्रि. फॉम्र्यूला-वन शर्यतीतून माघार घेतली आहे. करोना विषाणूची तापासारखी प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर मॅकलॅरेनने माघारीचा निर्णय घेतला आहे. पाच जणांमध्ये ही लक्षणे आढळून आली असून त्यापैकी चार जण हासमधील आहेत.

फिफा विश्वचषकाच्या पात्रता लढती पुढे ढकलण्याची मागणी

दक्षिण अमेरिका फुटबॉल महासंघाने करोनाच्या भीतीमुळे कतारमधील २०२२ फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या लढती पुढे ढकलण्याची मागणी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडे (फिफा) केली आहे. ‘‘दक्षिण अमेरिकेतील संघ आपल्या खेळाडूंना या लढतीसाठी खेळविण्याकरिता उत्सुक नाहीत. कारण हेच खेळाडू मोठा धोका पत्करून आपल्या व्यावसायिक संघाचे सामने अर्धवट सोडून अन्य देशांतून या स्पर्धेसाठी येणार आहेत,’’ असे दक्षिण अमेरिका महासंघाने फिफाचे महासचिव फातमा सामौरा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पात्रता फेरीच्या सामन्यांना २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे.