आयपीएलच्या धर्तीवर क्षेत्ररक्षणाचे आश्चर्यचकीत करणारे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. टी-२० ची लीग स्पर्धा असल्याने यात प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. फलंदाज कमीत कमीत चेंडूत मोठे फटके मारून जास्त धाव जमा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे क्षेत्ररक्षणही तितकेच महत्त्वाचे ठरते. फलंदाजाने हवेत मारलेले फटक्यांवर झेल टिपण्यासाठी खेळाडू जिवाचे रान करताना आपल्याला आयपीएलमध्ये पाहायला मिळाले आहेत. असाच एक भन्नाट झेल सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात टिपला.
मुंबईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सिमन्स आणि राणा बाद झाल्यानंतरही पार्थिव पटेलवर कोणताच दबाव दिसून येत नव्हता. त्याच्या बॅटला चांगलाच सुर गवसलेला पाहायला मिळत होता. अशावेळी डेव्हिड वॉर्नरने लाँग ऑनवर पार्थिव पटेलचा अप्रतिम झेल टिपला.
चेंडूचा अचूक अंदाज घेऊन चित्त्याच्या चपळाईने वॉर्नरने धावत जाऊन झेल टिपला. झेल टिपल्यानंतर त्याच जोशात त्याने सेलिब्रेशन देखील केले. वॉर्नरने टिपलेल्या झेलच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे. सामन्याच्या सातव्यात षटकात मुंबईला तिसरा धक्का बसला होता आणि धावसंख्या केवळ ३६ इतकी होती. हैदराबादने मुंबईला वेसण घातले. वीस षटकांच्या अखेरीस मुंबईला १३८ धावांपर्यंतच मजल मारता आली.