श्रीलंकेचा ज्येष्ठ फिरकीपटू रंगना हेरथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्ध गॅले येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर हेरथने निवृत्ती स्विकारणार असल्याचं जाहीर केलं आहे. 19 वर्षांपूर्वी रंगना हेरथने याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सध्या रंगना हेरथच्या खात्यात कसोटी क्रिकेटमध्ये 430 बळी जमा आहेत. इंग्लंडविरुद्ध कसोटीत हेरथला रिचर्ड हेडली, स्टुअर्ट ब्रॉड आणि कपील देव यांना मागे टाकण्याची संधी आहे.

मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर रंगना हेरथ श्रीलंकेचा कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. हेरथने श्रीलंकन क्रिकेटच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल कळवलं आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही हेरथ याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 6 नोव्हेंबरपासून श्रीलंका व इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.