प्रणॉयसमवेत चुरशीची लढत; पुढील फेरीत केन्टोशी सामना

कोवलून : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी आपापले सामनेजिंकत हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या चौथ्या मानांकित श्रीकांतने रोमहर्षक रंगलेल्या सामन्यात भारताच्याच एच. एस. प्रणॉयला १८-२१, ३०-२९, २१-१८ पराभूत करत आगेकूच केली.

प्रणॉयने जवळपास एक तास सात मिनिटे श्रीकांतला विजयासाठी झुंजवले. पण श्रीकांतने आपला सर्व अनुभव पणाला लावत बाजी मारली. त्याला उपांत्यपूर्व फेरीत जपानचा केन्टा निशिमोटो आणि थायलंडच्या कँटापोन वँगचारोएन यांच्यातील विजेत्याशी लढत द्यावी लागेल.

ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँग याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्यामुळे समीर वर्माला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ डेन्मार्कचा हॅन्स-ख्रिस्तियन सोलबर्ग विट्टिंघस आणि हाँगकाँगचा ली चेऊक यिऊ यांच्यातील विजेत्याशी पडेल. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना चायनीज तैपेईच्या ली यँग आणि सू या चिंग या जोडीकडून १७-२१, ११-२१ अशी हार पत्करावी लागली.

प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या दोन शिष्यांमध्ये तासाभरापेक्षा जास्त रंगलेला संघर्ष पाहायला मिळाला. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या श्रीकांतला पहिल्या गेममध्ये प्रणॉयच्या वेगवान खेळाचा सामना करता आला नाही. ९-९ अशा बरोबरीनंतर प्रणॉयने १४-१० अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर १५-१५ अशा स्थितीनंतर प्रणॉयने पहिला गेमजिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोघांनीही तोडीस तोड खेळ केला. श्रीकांतने कडव्या झुंजीनंतर हा गेम ३०-२९ असाजिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये श्रीकांतने ११-४ अशी भक्कम आघाडी घेतली. पण प्रणॉयने चांगला खेळ करत १६-१६ अशी बरोबरी साधली. मात्र श्रीकांतने अखेरच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्यपूर्व फेरी गाठली.