दहावी परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवणाऱ्या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूची प्रेरणादायी कहाणी
दहावीचे वर्ष म्हणजे प्रत्येक घरात गांभीर्याचे वातावरण असते. पण जेमतेम दोन महिन्यांच्या अभ्यासाच्या बळावर मुंबईकर टेबल टेनिसपटू सृष्टी हलेंगडीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के (खेळाच्या २५ गुणांसह) गुणांची कमाई केली. खेळात कारकीर्द घडवण्यासाठी अभ्यासाला सोडचिठ्ठी द्यावी लागते, या समजाला बाजूला सारत सृष्टीने मिळवलेले यश क्रीडापटूंसाठी प्रेरणादायी आहे.
सृष्टीची याच वर्षी भारतीय संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी सहा वेळा विदेश वारी, त्यासाठी आयोजित होणारी सराव शिबिरे, देशांतर्गत स्पर्धा यामुळे सृष्टीने डिसेंबरच्या उत्तरार्धात अभ्यासाला सुरुवात करूनही हे यश मिळवले.
सातव्या वर्षी सृष्टीने टेबल टेनिसची रॅकेट हाती घेतली. उंचीची मिळालेली नैसर्गिक देणगी, काटक शरीर आणि आक्रमक सर्वागीण खेळाच्या जोरावर सृष्टीने विविध वयोगट, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. यवतमाळ येथे झालेल्या राज्य मानांकन स्पर्धेत १८ वर्षांखालील, २१ वर्षांखालील आणि महिला गटात अशी जेतेपदांची हॅट्ट्कि केली. मुंबईत झालेल्या मुंबई सुपर लीग टेबल टेनिस स्पर्धेत सृष्टीला सर्वाधिक बोली मिळाली होती. २०१५मध्ये दिल्लीत झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात जेतेपद पटकावले. भारतात झालेल्या जागतिक कनिष्ठ स्पर्धेत तिने कांस्यपदकावर नाव कोरले. इजिप्तमध्ये झालेल्या आयटीटीएफ जागतिक कॅडेट चॅलेंज स्पर्धेत सृष्टी भारताची एकमेव प्रतिनिधी होती. या स्पर्धेत तिने दोन कांस्यपदके मिळवली. २००८ ते २०१५ या सात वर्षांच्या कालावधीत सृष्टीच्या नावावर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाची १११ पदके आहेत. यामध्ये ३८ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४३ कांस्यपदकांचा समावेश आहे.
‘‘सातत्याने खेळत असल्यामुळे अभ्यास आणि टेबल टेनिस यांचे वेळापत्रक कसे जपायचे याची कल्पना होती. पण दहावीचे वर्ग एप्रिलपासूनच सुरू होतात. परंतु याच काळात भारतीय संघात खेळण्यासाठी निवड झाली आणि शाळेतली उपस्थिती कमी होत गेली. संपूर्ण वर्षांत जेमतेम महिनाभर शाळेत जाऊ शकले. मात्र माझी शाळा दहिसर विद्यामंदिरातील शिक्षक आणि व्यवस्थापनाने कधीही दडपण जाणवू दिले नाही. प्राथमिक, माध्यमिक स्तरावर मला ९० टक्क्यांच्या आसपास गुण मिळत होते. मी कधीच क्लासला गेलेले नाही. मित्रमैत्रिणी अभ्यासाविषयी चर्चा करत असत. मी दौऱ्यावर जाताना पुस्तके नेत असे. सराव, सामने, प्रवास यातून वेळ मिळेल, तेव्हा अभ्यास करत असे. १५ डिसेंबरला पहिल्यांदा पुस्तके सविस्तर पाहिली. स्पर्धाच्या वेळापत्रकामुळे मी थेट पूर्वपरीक्षा दिली. दोन महिन्यांत सगळा अभ्यास पूर्ण करायचा असल्याने दडपण वाढले. मात्र शिक्षकांनी माझ्यासाठी अतिरिक्त तासिका घेतल्या. अभ्यासात काहीही अडचण आली तर शिक्षक तात्काळ मदत करत असत. घरच्यांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे यश साकारू शकले,’’ असे सृष्टीने सांगितले.
‘‘घरात बसून राहण्याची सवय नसल्याने शेवटचा पेपर संपल्यावर दोन तासांत कोर्टवर खेळायला गेले. दोन महिन्यांत वाढलेले वजन कमी करायचे आहे. टक्के खूप आहेत, पण वाणिज्य शाखेलाच प्रवेश घेणार आहे,’’ असे सृष्टीने सांगितले.