पाकिस्तानी संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने, पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचा दर्जा हा इंडियन प्रिमीअर लीगमधील सामन्यांपेक्षा सरस असल्याचं म्हटलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रझाकला पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोणत्याही संघात जागा मिळालेली नाहीये. मात्र ३८ वर्षीय रझाकने पुढच्या वर्षी टी-२० लीगमध्ये पुन्हा सहभागी होण्याचा आत्मविश्वास दर्शवला आहे.

“पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचा दर्जा हा इंडियन प्रिमीअर लीगमधील सामन्यांपेक्षा सरस आहेत. मात्र जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळता तेव्हा पाकिस्तान सुपर लीग ही तुमच्यासाठी खेळाडू म्हणून सोपी ठरते. यंदाच्या हंगामात मला या स्पर्धेत खेळण्याची मनापासून इच्छा होती, मात्र ती काही पूर्ण झाली नाही. मात्र येत्या काही काळांत मी स्थानिक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि माझा फिटनेस कायम राहिला तर पुढच्या हंगामात मी नक्कीच सहभागी होऊ शकेन.” एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रझाक म्हणाला.

आपल्या १७ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अब्दुल रझाकने कसोटी, वन-डे आणि टी-२० मिळून ३४३ सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या काळात अब्दुल रझाकने सहा शतकांसह तब्बल ७४१९ धावा कुटल्या आहेत. याचसोबत गोलंदाजीतही अब्दुल रझाकने ३८९ बळी घेतले आहेत. आयपीएलने आतापर्यंत आपले दहा हंगाम पूर्ण केले असून पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा २०१६ साली सुरु करण्यात आली. अल्पावधीत पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेने पाकिस्तान आणि दुबई सारख्या भागात आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला असला तरीही आयपीएलचे सामने हे प्रक्षेपण आणि प्रेक्षकवर्गाच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लिगच्या तुलनेत नक्कीच पुढे आहेत.