इंग्लिश संघाने नुकत्याच झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतावर २-१ अशा फरकाने विजय मिळवला. याचे इंग्लिश क्रिकेट संघाचे तांत्रिक संचालक आणि मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी मुक्तकंठाने कौतुक केले आहे. शिकण्याची आणि अंगिकारण्याची इंग्लिश संघाची वृत्ती या मालिकेत निर्णायक ठरल्याचे फ्लॉवर यांनी सांगितले.
‘‘आम्ही येथे आलो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिकलो आणि आत्मसात केले की धावा कशा काढायच्या. या क्षणी मला विचाराल, तर ही सर्वात समाधानाची गोष्ट असल्याचे मी सांगेन,’’ असे फ्लॉवर यांनी एका वाहिनीला सांगितलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘‘या इंग्लिश खेळाडूंनी स्वत:ला आणि देशाला गर्व वाटेल, अशीच कामगिरी बजावली आहे. भारतीय भूमीवर येऊन शिकणे, हाच विजयाचा मूलमंत्र आहे,’’ असे फ्लॉवर म्हणाला. ते पुढे म्हणाले की, ‘‘फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर फिरकी कशी खेळून काढायची, अनुकूल वातावरणात फलंदाजी करणाऱ्या यजमान संघाचे २० बळी कसे मिळवायचे आणि वेगळ्या वातावरणाची कसे जुळवून घ्यायचे, याचे उत्तर उदाहरण इंग्लिश संघाने दिले.’’