21 November 2017

News Flash

भारतीय तायक्वांडो महासंघही निलंबित!

भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर (आयओए) बंदी घालण्यात आल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आचारसंहितेनुसार निवडणुका न

वृत्तसंस्था, नवी दिल्ली | Updated: December 28, 2012 8:18 AM

भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर (आयओए) बंदी घालण्यात आल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आचारसंहितेनुसार निवडणुका न घेतल्याबद्दल भारतीय तायक्वांडो महासंघाला आंतरराष्ट्रीय तायक्वांडो संघटनेने निलंबित केले आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदीची कारवाई केल्यानंतर आम्हीसुद्धा भारतीय तायक्वांडो महासंघावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करत आहोत,’’ असे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो महासंघाने म्हटले आहे. निलंबनाची कारवाई करणारे पत्र भारतीय तायक्वांडो महासंघाकडे काही दिवसांपूर्वीच आले असल्याचे समजते. भारतीय ऑलिम्पिक समितीवर अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या अभयसिंग चौटाला यांच्या मर्जीतील हरीश कुमार हे भारतीय तायक्वांडो महासंघावर अध्यक्षपदी विराजमान झाले होते. पण त्यांच्या या निवडीला कार्यकारिणी सदस्यांनी विरोध दर्शवला होता. पण निलंबनाच्या पत्रामध्ये अशाप्रकारचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
‘‘हरीश कुमार यांच्या वर्तणुकीविषयी काही सदस्यांनी आंतरराष्ट्रीय तायक्वांडो महासंघाकडे तक्रार केली होती. आयओएवरील बंदीनंतरही हरीश कुमार हे आयओएचे अधिकारी ललित भानोत यांच्यासह अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत,’’ असे भारतीय तायक्वांडो महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली भारतीय तायक्वांडो महासंघ ही दुसरी संघटना ठरली आहे.

First Published on December 28, 2012 8:18 am

Web Title: taekwondo federation of india dismissed