न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे यजमानांनी १० गडी राखून सामना खिशात घातला आणि मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील हा भारतीय संघाचा पहिला पराभव ठरला. त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापन दुसऱ्या सामन्यासाठी काही बदल करू शकते असे बोलले जात आहे.

इशांत शर्माला दुखापत

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा घोट्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. अशा वेळी भारतीय संघाकडे उमेश यादव आणि नवदीप सैनी हे दोन चांगले वेगवान गोलंदाज आहेत. या दोघांपैकी उमेश यादवला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. रणजी क्रिकेट स्पर्धा २०१९ मध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याचसोबत टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतही त्याने भेदक मारा केला होता. त्यामुळे उमेश यादवचा अंतिम ११ मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

पृथ्वी शॉ फलंदाजीत सातत्याने अपयशी

पृथ्वी शॉ हा मुंबईचा प्रतिभावंत खेळाडू आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्या आधी न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतदेखील पृथ्वी शॉ ला संधी देण्यात आली होती, पण त्या मालिकेतही त्याची फलंदाजी अपयशी ठरताना दिसली. तसेच सराव सत्रात पृथ्वी शॉ ला पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तंदुरूस्त असल्याचे रवी शास्त्री यांनी सांगितले आहे. पण तरीदेखील त्याची फलंदाजीतील लय पाहता त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिल याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शुभमनने गेल्या महिन्यात न्यूझीलंड XI विरूद्ध चांगली कामगिरी केली होती. एका सामन्यात तर त्याने द्विशतकदेखील लगावले होते.

रवींद्र जाडेजाला संधी मिळण्याची शक्यता

भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जाडेजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजी मजबूत असावी या विचार करून हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले होते. पण इतर फलंदाजांप्रमाणेच हनुमा देखील फलंदाजीत अपयशी ठरला. गोलंदाज म्हणूनही हनुमाचा वापर करता आला असता पण त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून जाडेजाचा संघात समावेश करणे अधिक शक्यता आहे.