15 July 2020

News Flash

टीम इंडियाच्या खेळाडूंना दर तीन महिन्यांनी करावी लागते ‘ही’ चाचणी

BCCI अधिकाऱ्याने दिली महत्त्वाची माहिती

बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) आपल्या खेळाडूंसाठी नेत्र परीक्षण म्हणजेच डोळ्यांची चाचणी अनिवार्य केली आहे. “बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंसाठी डोळ्यांची चाचणी अनिवार्य असेल”, अशी माहिती कॅबने एका पत्रकाद्वारे दिली. सोमवारी बंगाल क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कर्मचारी वर्ग आणि कॅबचे पदाधिकारी यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बंगालचे मुख्य प्रशिक्षक अरुण लाल यांनी खेळाडूंसाठी डोळ्याच्या चाचणीचा प्रस्ताव बैठकीत सर्वांसमोर ठेवला होता. तो प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयाचे BCCI च्या अधिकाऱ्याने कौतुक केले. आयएएनएसशी बोलताना BCCI अधिकाऱ्याने टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दलचीही एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. “कॅबने घेतलेला नेत्र तपासणी चाचणीचा निर्णय खूपच कौतुकास्पद आहे. गेल्या तीन वर्षांपासून विराट आणि इतर खेळाडूंनादेखील दर तीन महिन्यांनी डोळ्यांची चाचणी द्यावी लागते. क्रिकेटसारख्या खेळात तुमची नजर हे तुमच्यासाठी बलस्थान असायला हवं. वेगवान गोलंदाजाचा चेंडू तुमच्या दिशेने येताना तुमची नजर चांगली नसेल, तर त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागू शकते”, अशा शब्दात BCCI अधिकाऱ्याने नेत्र तपासणीचे महत्त्व सांगितले.

क्रिकेटमध्ये चेंडू नवा असताना तो अधिक स्विंग होतो आणि वेगाने फलंदाजाच्या अंगावर येतो. अशा वेळी डोळ्यांची चाचणी झाली असेल, तर नव्या चेंडूवर फलंदाजांना खेळताना त्याचा फायदाच होईल, असे मत लाल यांनी कॅबच्या बैठकीत मांडले होते. तर, “नजर हा एक महत्वाचा पैलू आहे. फलंदाजी करताना रिफ्लेक्सचा संबंध येतो. त्यावेळी नजर खूप मोठी भूमिका बजावते. त्यामुळे आम्हाला खेळाडूंच्या डोळ्यांबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही”, असे कॅबचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी सांगितले होते.

या प्रकरणी अधिक लक्ष घालण्यासाठी कॅब आता नेत्र तज्ञ आणि राज्य संघटनेच्या वैद्यकीय समिती सदस्य नंदिनी रॉय यांचा सल्ला घेणार आहे. हंगामाची सुरूवात होण्याआधी लावण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये डोळ्यांची चाचणी घेतली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 4:09 pm

Web Title: team india players undergo quarterly eye tests says bcci official vjb 91
Next Stories
1 हॉकी इंडियाकडून खेलरत्न पुरस्कारासाठी राणी रामपालची शिफारस
2 …नाहीतर तुम्हीही या समस्येचा भाग आहात, वर्णद्वेषाविरोधात डॅरेन सॅमीचं परखड मत
3 भारत-ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र कसोटीवर स्मिथ म्हणतो…
Just Now!
X