दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयाने सर्व स्तरांतून त्याच्याबद्दलच्या प्रेमाचा आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही त्याच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्याला पुढील वर्षी आयपीएलमध्ये येऊन खेळण्याचे निमंत्रणदेखील दिले. पण डीव्हीलियर्सच्या निवृत्तीने खरा पेच हा दक्षिण आफ्रिकेच्या संघापुढे निर्माण केला आहे.

पुढील वर्षी म्हणजेच २०१९ साली क्रिकेट विश्वचषक खेळण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक संघाने आपल्या योजना आणि आराखडे तयार करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र आफ्रिकेच्या संघातून डीव्हीलियर्स हा एक मोठा खेळाडू बाहेर झाल्यामुळे आता त्याच्या जागी त्याच्याएवढा सक्षम खेळाडू शोधण्याची कसोटी आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनापुढे आणि निवड समितीपुढे आहे. सध्याचा आफ्रिकेचा संघ पाहता संघात पुरेसा समतोल राखला गेला आहे. मात्र डीव्हीलियर्ससारखी चौफेर फटकेबाजी, वेळ पडल्यास शांत आणि संयमी खेळ आणि महत्वाची बाब म्हणजे चपळ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टी ध्यानात घेता सध्या ४ खेळाडूंवर निवडसमितीची नजर राहील. २०१९ला डीव्हीलियर्सची जागा घेऊ शकतील असे ४ खेळाडू सध्या आफ्रिकेच्या संघात खेळत आहे.

१. एडन मार्क्रम

एडन मार्क्रमच्या नेतृत्वाखालील आफ्रिकेच्या संघाने २०१४ साली झालेला १९ वर्षाखालील युवा विश्वचषक जिंकला होता. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे झाली होती. त्या स्पर्धेपासूनच त्याने साऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही काळातच त्याला आफ्रिकेच्या नियमित संघात स्थान मिळाले. बांगलादेशविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर एकदिवसीय संघातही त्याने स्थान मिळवले. त्याच्या कारकिर्दीतील तिसऱ्याच एकदिवसीय सामन्यात त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत अनेक एकदिवसीय सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व केले आहे. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी २७च्या आसपास आहे. तसेच अ श्रेणी क्रिकेटमधील त्याची कामगिरीही उल्लेखनीय आहे. त्यामुळे डीव्हीलियर्ससाठी तो एक सक्षम पर्याय ठरू शकतो.

२. हेनरीच क्लासेन

क्लासेन हा देखील आफ्रिकेचंग्य संघातील एक उदयोन्मुख युवा खेळाडू आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सामना जिंकून देणारी खेळी करत त्याने साऱ्यांचे लक्ष वेधले होते. वंडरर्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्याने दोन्ही वेळा भारताविरुद्ध हि किमया केली होती. त्या खेळीच्या जोरावर त्याला राजस्थान संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ९०पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळत १२७७ धावा ठोकल्या होत्या. राजस्थानच्या संघात स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीमुळॆ त्याला अंतिम ११मध्ये स्थानही मिळाले. क्लासेन हा एक चांगला यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्यामुळे डीव्हीलियर्सच्या जागी हा खेळाडू अधिक चांगला ठरू शकतो, अशी सध्या चर्चा आहे.

३. थीएनस डी ब्रुयन

डी ब्रुयन आफ्रिकेतील एक चांगला आणि स्फोटक फलंदाज आहे. नजीकच्या भविष्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारात तो उत्तम खेळ करू शकेल, असा विश्वास अनेकांना आहे. गेल्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले. त्याने आतापर्यंत ५ एकदिवसीयत आणि २ टी २० सामने खेळले आहेत. अद्याप त्याने आंतरराष्ट्रीय संघात फार मोठी कामगिरी केली नसली तरी त्याची देशांतर्गत कामगिरी चांगली आहे. अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४१ च्या सरासरीने आणि ८५च्या स्ट्राईक रेटने एकूण १२३४ धावा केल्या आहेत. या आकड्यांच्या बळावर तो संघात एक महत्वाची भूमिका बजावू शकतो आणि डीव्हीलियर्सची कमतरता भरून काढू शकतो.

४. क्रिस्टीयन जाँकर

जाँकर हा आफ्रिकेच्या ताफ्यातील एक स्फोटक फलंदाज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव अशी तगडी फौज असलेल्या भारतीय संघाविरुद्ध जाँकरने पदार्पणाच्या सामन्यात २४ चेंडूत ४९ धावा फाटकावल्या होत्या. या खेळीमुळे त्याने टी २० क्रिकेटमध्ये आपले पाय रोवले. त्याचे देशांर्तगत सामन्यातील करिअरदेखील चांगले आहे. त्याने अ श्रेणी क्रिकेटमध्ये ४० च्या सरासरीने आणि १००हुन अधिकच्या स्ट्राईक रेटने २ हजार ८४१ धावा केल्या आहेत. त्यामुळे डीव्हीलियर्ससारख्या स्फोटक फलंदाजाला तो एक चांगला पर्याय ठरू शकतो.