इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

सन ह्युंग -मिनच्या गोलच्या जोरावर टॉटनहॅमने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) बर्नलेवर १-० असा विजय मिळवला. हॅरी केनच्या पासच्या जोरावर सनने हा गोल केला.

सन आणि हॅरी केन यांचे एकत्रित मिळून गोल करण्याचे कौशल्य नेहमीच पाहायला मिळते. या दोघांनी एकमेकांकडे पास देत गोल नोंदवण्याची ही २९वी वेळ ठरली. याच ‘ईपीएल’च्या हंगामात या दोघांनी मिळून गोल करण्याची नववी वेळ ठरली. सनचा हा सर्व स्पर्धामधील मिळून गेल्या ९ लढतींतील १०वा गोल होता. टॉटनहॅमने या विजयासह पाचवे स्थान मिळवले. वेस्ट ब्रॉमविचने ब्रायटनविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. ब्रायटन १६व्या आणि वेस्ट ब्रॉमविच १७व्या स्थानी आहे.

बाटरेमेयूंच्या निलंबनाची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

माद्रिद : बार्सिलोना फुटबॉल क्लबचे अध्यक्ष जोसेफ बाटरेमेयू यांच्यासह त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. बाटरेमेयू यांना हटवण्यासाठी सार्वमत घेण्याची गरज असून त्यासाठी अधिकृत परवानगी स्थानिक आरोग्य खात्याकडून करोना साथीमुळे घेणे आवश्यक आहे.

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा

बरोबरीनंतरही मिलान अग्रस्थानी

मिलान : एसी मिलान आणि रोमा यांच्यात सेरी-ए फुटबॉल लीगमध्ये ३-३ अशी बरोबरी झाली. या बरोबरी नंतरही एसी मिलानने अग्रस्थान कायम राखले आहे. झ्लॅटन इब्राहिमोविचच्या दोन गोलांमुळे एसी मिलानला ७९व्या मिनिटाला ३-२ अशी आघाडी घेता आली होती. मात्र रोमाकडून मराश कुंबुलाने ८४व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली.