गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत टीकेचा धनी होतो आहे. विंडीज दौऱ्यातील एका-दुसऱ्या सामन्याता अपवाद वगळता पंतने फलंदाजीत निराशाच केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेनंतर पंतला विश्रांती देत धोनीला संघात स्थान द्या अशी मागणी सोशल मीडियावर होत होती. मात्र ऋषभ पंतची महेंद्रसिंह धोनीसोबत तुलना करणं चुकीचं असल्याचं मत भारताचा माजी आक्रमक फलंदाज युवराज सिंहने व्यक्त केलं आहे.

“कोणीतरी ऋषभ पंतशी चर्चा करणं गरजेचं आहे. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याचा खेळ अजून चांगला कसा होईल यावर काम करता येईल. त्याच्यावर टीका करत राहणं हा पर्याय नाहीये. धोनीशी त्याची तुलना करणं अयोग्य आहे, धोनीला महान खेळाडू बनण्यासाठी काही कालावधी लागला होता.” Times Now वाहिनीशी बोलत असताना युवराजने ऋषभ पंतच्या खराब कामगिरीबद्दल आपलं मत नोंदवलं.

यावेळी बोलत असताना युवराजने महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयक चर्चांवरही आपलं मत नोंदवलं. “धोनीच्या निवृत्तीविषयी सतत चर्चा करत राहणं मला योग्य वाटत नाही. आपण त्याला वेळ देणं गरजेचं आहे, आणि त्याला निर्णय घेण्याची मूभा द्यायला हवी. भारतीय क्रिकेटसाठी त्याने मोठं योगदान दिलं आहे.” दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सुटल्यानंतर भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.