मैदानावर कोणालाही चेंडू लागला की प्रथम ऑस्ट्रेलियायच्या फील ह्यूजचं नाव क्रीडाप्रेमींना आठवत आणि काळजात धस्स होतं. नुकतीच श्रीलंकेच्या एका खेळाडूसोबतही अशीच घटना घडली होती. त्यानंतर आज भारतातील कोलकाता येथे असाच एक प्रकार भारताचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडा याच्याबाबतीत घडला.

कोलकाता येथे मुश्ताक अली अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी बंगालचा संघ एक टी २० सामना खेळत होता. हा सामना सराव सामन्यासारखा होता. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात सामना सुरु असताना दिंडाने फलंदाजाला चेंडू टाकला. दिंडाने टाकलेला चेंडू फलंदाजाने त्याच वेगाने टोलवला आणि तो चेंडू थेट दिंडाच्या कपाळावर जाऊन आदळला आणि दिंडा मैदानावरच कोसळला.

दुखापत किती गंभीर आहे, हे सुरुवातीला समजू शकले नाही. पण त्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्याला योग्य ती वैद्यकीय ट्रीटमेंट देण्यात आली व त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. दिंडाला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर दिंडाने मैदानात येत आपले षटकही पूर्ण केले.