कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडकात आपला दुसरा विजय नोंदवला आहे. मुंबईने कर्नाटकवर ८८ धावांनी मात केली. अजिंक्य रहाणेने सामन्यात १४८ तर श्रेयस अय्यरने ११० धावा पटकावल्या. सलामीवीर पृथ्वी शॉनेही ६० धावा काढून दोन्ही फलंदाजांना चांगली साथ दिली. या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ३६२ धावांचा डोंगर उभारला.

कर्नाटकचा एकही गोलंदाज मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालू शकला नाही. बंगळुरुत झालेल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत धावा वसुल केल्या. कर्नाटककडून विनय कुमार, अभिमन्यू मिथून, स्टुअर्ड बिन्नी आणि कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या कर्नाटकच्या फलंदाजांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. सलामीवीर मयांक अग्रवालने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. ठराविक अंतराने कर्नाटकचे फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे मोक्याच्या क्षणी मोठी भागीदारी रचणं त्यांना जमलं नाही. अखेरच्या फळीत कृष्णप्पा गौथम आणि कर्णधार विनय कुमारने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची डाळ शिजू शकली नाही. मुंबईकडून शम्स मुलानीने ४ तर तुषार देशपांडे आणि शिवम दुबे जोडीने प्रत्येकी २-२ बळी घेतले.