क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचा खुलासा
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तयार केलेल्या नियमानुसार २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी रमेश विपट आणि प्रा. गणपतराव माने यांची निवड करण्यात आली आहे, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
‘लोकसत्ता’मध्ये ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान वि. वि. करमरकर लिखित ‘पुरस्कारांचे गौडबंगाल’ ही वृत्तमालिका प्रकाशित झाली होती. त्याबाबत खुलासा करताना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने म्हटले आहे की, ‘माने हे गेली ४० वष्रे क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. १९८६-८७ या वर्षांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकर्ता) देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विविध खेळांच्या अनेक स्पर्धाच्या आयोजनात माने यांचे योगदान आहे. राज्य सरकारद्वारे नियुक्त केलेल्या राज्य क्रीडा धोरण समिती व शिवछत्रपती क्रीडा छाननी समितीवरसुद्धा काही वष्रे माने यांनी काम पाहिले आहे.’
‘पुण्याचे विपट हे गेली ३५ वष्रे क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. क्रीडा प्रचार व प्रसारकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या विपट यांना १९९५-९६ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (संघटक/ कार्यकत्रे) प्रदान करण्यात आला होता. जलतरण खेळांच्या क्रीडा स्पर्धाच्या संयोजनामध्ये विपट यांचे मोठे योगदान आहे. यामध्ये राज्य जलतरण क्रीडा स्पर्धा, शालेय राष्ट्रीय जलतरण क्रीडा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या आहेत. विपट यांच्या मार्गदर्शनाखली अनेक खेळाडू घडले आहेत,’ असा दावा क्रीडा खात्याने केला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्जदाराने तसेच राज्यातील विविध जिल्हा क्रीडा अधिकारी व विभागीय उपसंचालकांकडून आलेले १९ प्रस्ताव व यापूर्वीच्या १९ व्यक्तींची (२००९-१०, २०१०-११, २०११-१२ या वर्षांतील विचारार्थ ठेवलेली नावे) अशी एकूण ३८ नावे राज्य शासनाच्या जीवनगौरव निवड समितीसमोर होती. त्यातून माने व विपट यांची निवड नियमानुसार करण्यात आली आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले.
क्रीडा पुरस्कारांबाबतच्या सकारात्मक टीकेची दखल क्रीडा खाते घेईल. या पुरस्कार लेखमालिकेतून ज्या गोष्टी क्रीडा क्षेत्राच्या हिताच्या असतील त्यांचा शासन नक्कीच विचार करील, असेही क्रीडा आणि युवक संचालनालयाने म्हटले आहे. ग्रामीण भागामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा. गाव, तालुका स्तरावर जास्तीत जास्त उत्तम दर्जाचे खेळाडू आणि प्रशिक्षक तयार व्हावेत तसेच या भागातील खेळाडूंच्या गुणांना वाव मिळावा, असा या पुरस्कारांमागचा उद्देश असल्याचेही शासनाने म्हटले आहे.