भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. माजी कर्णधार एम.एस धोनी आणि रोहित शर्मा संघात असल्यामुळे विराट कोहली यशस्वी कर्णधार झाल्याचे म्हटलेय. तुमच्या नेतृत्वाची खरी परिक्षा एखाद्या फ्रेंचायजीमध्ये कर्णधारपद भूषवताना होते. जिथे तुम्हाला मदतीसाठी इतर अनुभवी खेळाडू नसतात, असे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात गौतम गंभीर म्हणाले.

गौतम म्हणाले की, विराटला अजून खूप पुढं जायचं आहे. विश्वचषकामध्ये विराट चांगला खेळला पण त्याला खूप काही करायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो चांगलं नेतृत्व करतो कारण त्याच्याकडं रोहित आणि धोनी आहेत. नेतृत्वाचा कस तेव्हा लागतो जेव्हा आयपीएलमध्ये एखाद्या संघाचं नेतृत्व करता. त्यावेळी तुमच्याकडे मोठे खेळाडू नसतात. आरसीबीकडून विराट कोहली कर्णधार म्हणून किती यशस्वी ठरला हे तुम्हाला माहितच आहे. विराट कोहलीच्या तुलनेत रोहित शर्मा आणि धोनी आयपीएलमध्ये किती यशस्वी आहेत हे तुम्हाला माहित आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून राहुलला खूप संधी दिली आहे. आता वेळ आली आहे रोहित शर्माला कसोटीमध्येही सलामीला पाठवायला हवं, असेही गंभीर म्हणाला.

विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असते. २००७ मध्ये मला संघात स्थान पटकावता आलं नाही तेव्हा क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेताल होता. तेव्हा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याच वर्षी टी२० विश्वचषक भारताने जिंकला होता. मला अंडर १४ आणि अंडर १९ वर्ल्डकपदेखील खेळता आला नव्हता, अशी खंतही गंभीरने बोलून दाखवली.