आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आता थोडे दिवस उरले आहेत. १८ जून ते २२ जून या कालावधीत भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना खेळला जाईल. साऊथम्प्टनच्या एजेस बाऊलवर रंगणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसून आला. बीसीसीआय़ने विराटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हि़डिओत विराट वेगवान गोलंदाजी, बाऊन्सरच्या माऱ्याला सामोरा जात आहे. विराटसोबत या व्हिडिओत ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाजही सराव करताना दिसून आले. भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि फिरकीपटू रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजी केली.

 

भारतीय संघाने ३ जून रोजी साऊथॅम्प्टन गाठले. त्यानंतर ते १० दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत होते. या सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव करण्याबरोबर टीम इंडियावे ३ दिवसांचा इंट्रास्क्वॉड सामना खेळला. या सामन्यात शुबमन गिलने १३५ चेंडूत ८५ धावांची खेळी केली, तर रिषभ पंतने ९४ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावांची खेळी साकारली.

दुसरीकडे न्यूझीलंड संघानेही इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने १-० ने विजय मिळवला. त्यामुळे या दोन्ही संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना अटीतटीचा होईल, यात शंका नाही.