भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात विराटने शतकी खेळीची नोंद केली. वन-डे कारकिर्दीतलं त्याचं हे 41 वं शतक ठरलं. भारतीय संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही, विराटचं सातत्याने धावा करणं ही भारतीय संघासाठी चांगली बाब असल्याचं बोललं जातंय. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याची भूक विराटला इतरांपेक्षा वेगळं करते. याच स्वभावामुळे त्याने स्वतःचा खेळ एक वेगळ्या उंचीवर नेलाय असे कौतुगोद्गार फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी काढले आहेत.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये विराट, सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम खेळाडू – मायकल वॉर्न

“भारतीय संघ फलंदाजीमध्ये एका खेळाडूवर अवलंबून आहे असं अजिबात नाही. मात्र विराटने ज्या पद्धतीने स्वतःचा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय, त्या तुलनेत इतर खेळाडूंच्या कामगिरीला फारसं महत्व दिसून येत नाही. विराट सतत आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्यात प्रयत्नशील असतो. याचमुळे त्याच्या खेळात सुधारणा झालेली आहे. त्याच्यातला हाच गुण सर्वोत्तम असून तरुण खेळाडूंनी त्याचा आदर्श घेतला पाहीजे.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बांगर बोलत होते.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटची शतकी खेळी व्यर्थ, मात्र अनेक विक्रम केले नावावर

तिसऱ्या सामन्यात विराटचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. विराटने एकाकी झुंज देत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. 32 धावांनी भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने आपली पिछाडी 2-1 ने कमी केली. या मालिकेतला चौथा सामना मोहालीच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराटचा आक्रमक फॉर्म कायम, डिव्हीलियर्सला टाकलं मागे