भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. मंगळवारी आयसीसीने वन-डे क्रमवारी जाहीर केली. या यादीत विराट ८७१ गुणांसह पहिल्या तर रोहित ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दरम्यान ३० जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात २०२३ साली होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. ४ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.