करोना विषाणूने सध्या बहुतांश लोकांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या. इंग्लंड-वेस्ट इंडिज पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका खेळवण्यात आली. पण भारतीय संघ मात्र ऑगस्टच्या आधी मैदानात उतरणार नाही. त्यामुळे सर्व भारतीय क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. जुने फोटो पुन्हा पोस्ट करणे हा ट्रेंड सध्या सेलिब्रिटी फॉलो करत आहेत.
भारताचा कर्णधार विराट कोहली याने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत विराट थेट झाडाच्या फांदीवर चढून बसला आहे. लॉकडाउन काळात विराट झाडावर का बरं चढून बसला असेल असा चाहत्यांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण विराटनेच याचं उत्तर कॅप्शनमध्ये दिलं आहे. विराटचा हा फोटो आताचा नसून जुना आहे. एक काळ होता जेव्हा विराटला झाडावर चढून बसणं आणि निवांत वेळ घालवणं आवडायचं, तेव्हा त्याच्या मित्राने हा फोटो काढला होता.
विराटने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. नुकताच विराटने इन्स्टाग्रामवर ७० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सध्या विराटचे ७०.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. याचसोबत क्रीडाविश्वात विराटने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. बास्केटबॉल खेळाडू लीब्रोन जेम्स याला विराटने मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे. ७० मिलियनचा टप्पा गाठणारा पहिलावहिला भारतीय असा विक्रम विराटने केला आहे. पोर्तुगालचा क्रिस्टीआनो रोनाल्डो क्रीडापटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे २३२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यापाठोपाठ अर्जेंटिनाचा लियोनल मेसी हा १६१ मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियर १४० मिलियन फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.