भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात जेटली यांच्या निधनाबद्दल आपली शोकभावना प्रगट करण्यासाठी दंडावर काळया फिती बांधून उतरला आहे. भारत-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २२२ धावात संपुष्टात आला असून भारताला ७५ धावांची आघाडी मिळाली आहे.

राजकारणाबरोबर अरुण जेटली हे क्रिकेटशीही संबंधित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. दिल्ली क्रिकेट संघटनेचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. नऊ ऑगस्टपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. विराट कोहली याने टि्वट करुन जेटली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.

‘माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घरी आले होते,’ अशी आठवणही कोहलीने ट्विटमध्ये सांगितली आहे. जेटलींना क्रिकेटची विशेष आवड होती. त्यांनी १९९९ पासून ते २०१३ पर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष पद भूषवले. या पदावर असताना दिल्लीमधील क्रिकेटच्या सुधारणेसाठी आणि नवीन स्टेडियम बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जेटलींनी दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळेच दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली.